वाटून घ्यायचे बंद करा, आम्ही वेडे नाही

By Admin | Published: May 31, 2014 11:52 PM2014-05-31T23:52:24+5:302014-06-01T00:24:40+5:30

जिल्हा नियोजन बैठक : पालकमंत्र्यांचा जिल्हा परिषद सदस्यांना टोला

Stop sharing, we are not crazy | वाटून घ्यायचे बंद करा, आम्ही वेडे नाही

वाटून घ्यायचे बंद करा, आम्ही वेडे नाही

अहमदनगर : आता तुम्ही वाटून घ्यायचे बंद करा. आम्ही काही वेडे नाहीत. आम्हाला सगळं समजतं. कितीही निधी दिला तरी खर्चच होत नाही, हे काय चाललंय, अशा शब्दांत पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी जि. प. सदस्यांची आणि अधिकार्‍यांचीही कानउघडणी केली. या उपरही कामे झाली नाही तर दुसर्‍या यंत्रणांमार्फत केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा नियोजन समितीची शनिवारी बैठक झाली. त्यात २०१४-१५च्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री पिचड यांनी सर्वांनाच टोमणे मारले. जिल्हा नियोजनातून सर्वाधिक पैसा जि.प.ला दिला जातो. मात्र, मागील इतिहास पाहता त्यांच्याकडून निधीच खर्च होत नाही. हेही योग्य नसल्याचे पिचड म्हणाले. आमदारांनी ६०, जि.प. सदस्यांनी ३० तर खासदारांनी १० टक्के कामे सूचवावी, असे सूत्र पालकमंत्री यांनी घालून दिले आहे. त्याप्रमाणे कामांना मंजुरी द्या. आॅगस्टमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने त्याअगोदर वर्क आॅर्डर निघाल्या पाहिजे. यासाठी पालकमंत्री आगतिकतेने बोलत होते.तेच ते जिल्हा नियोजनाच्या बैठकीत तेच ते आणि तेच ते अनुभवायला मिळाले. ठराविक सदस्य तेच ते प्रश्न उपस्थित करतात आणि अधिकारी कामे न झाल्याची कारणे सांगताना आचारसंहिता आडवी आली, काम प्रगतीपथावर आहे, प्रस्ताव पाठवलाय अशी सरकारी उत्तरं अधिकारी देतात. गेल्या काही वर्षांपासून हा सिलसिला सुरू आहे. ठेकेदार-पोलीस मिलीभगत महापालिकेने नेमलेला ठेकेदार आणि पोलीस यांच्यात मिलीभगत आहे. टोल मिळावा म्हणून पोलीस शहरातून गाड्या सोडतात, असा आरोप खासदार गांधींनी केला. सर्व कामे झालेली असताना हे कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शहरातील फूटपाथ अतिक्रमणांनी नाहीसे झालेत. कोण्या एका माणसाच्या विरोधकांकडे लक्ष देऊ नका, असा टोमणाही त्यांनी आ. राठोड यांचे नाव न घेता मारला.

अच्छे दिन आनेवाले है...केंद्राकडचे प्रस्ताव मी आणि गांधी मंजूर करून आणू शकतो. जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करा, असे नवनिर्वाचित खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. त्यावर लगेच पाचपुते यांनी त्यांना ‘आता तुमचे अच्छे दिन आने वाले है’ असा टोला लगावला. खासदार लोखंडे आणि जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचीही ही पहिलीच सभा होती.

ही आम सभा नाही

महापौर संग्राम जगताप यांनी महापालिकेला सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करावी. डीपीडीसीतून सर्वाधिक रक्कम जि.प.ला दिली जाते. मग आम्हाला थोडीफार मदत करा अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री पिचड यांनी तुम्हाला २६६ कोटी रूपये मंजूर झालेत. त्यातून कामे करा, अडचण आली तर आम्ही आहोत. पण ही काही आम सभा नाही. निधीचे नियम ठरले आहेत, अशा शब्दात सुनावले.

निविदा कशी काढली

सुपा टोलनाक्याबाबत जि. प. सदस्य सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, आमदार विजय औटी यांनी प्रश्न उपस्थित केला. गांधी यांनीही पुलाच्या टोलवसुलीवर आक्षेप घेतला. कोरडे यांनी लाईट कटर बसविण्याची मागणी केली असता बांधकामच्या खैरी यांनी त्यासाठी साडेचार कोटी रूपये लागतील, असे स्पष्टीकरण दिले. मग टोलची निविदाच कशी काढली असा सवाल उपस्थित करण्यात आला. टँकर मंजुरी न दिल्याने औटी यांनी प्रांताधिकारी भोर यांच्यावर आगपाखड केली. आ. घुले यांनी सिंचन बंधार्‍याचा प्रश्न मांडला. पोलीस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी बाह्यवळण रस्त्यावरून वाहतुकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कुकडीच्या पाण्याबाबत बाबासाहेब भोस यांनी प्रश्न उपस्थित केला. राजेंद्र फाळके यांनीही कर्जतचे प्रश्न मांडले.

Web Title: Stop sharing, we are not crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.