नगर - पाथर्डी महामार्गावर तीन तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 02:42 PM2018-09-05T14:42:26+5:302018-09-05T14:42:33+5:30
अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे ६ वाजता भरधाव कोल्हापूर-पाथर्डी या एस.टी. बसने देवराई गावात समोरून येणाऱ्या मोटारसायकलीस धडक दिली.
करंजी : अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे ६ वाजता भरधाव कोल्हापूर-पाथर्डी या एस.टी. बसने देवराई गावात समोरून येणाऱ्या मोटारसायकलीस धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. या अपघातानंतर करंजी पोलीस दूरक्षेत्र चौकीशी संपर्क होत नसल्याने संतप्त जमावाने पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देत ३ तास कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर ३ तास रास्तारोको केला.
निमगाव (मायंबा, ता. शिरूर, जि. बीड) येथील राहुल महादेव राठोड व त्यांची पत्नी मनीषा महादेव राठोड हे आपल्या दुचाकीवरुन (क्रमांक एम. एच.१२ पी यु ३२३५) पुण्याकडे जात होते. सकाळी ६ वाजता देवराई गावात समोरून भरधाव येणाºया कोल्हापूर-पाथर्डी (क्रमांक एम.एच. १४ बीटी ४८७५) या पाथर्डी आगाराच्या बसने समोरून जोराने धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघात होताच बसचालक शिवाजी खेडकर व वाहक आदिनाथ आंधळे अपघातस्थळाहून पसार झाले. अपघाताची माहिती देण्यासाठी देवराई ग्रामस्थांनी करंजी पोलीस दूरक्षेत्र चौकीस व पाथर्डी पोलीस ठाण्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण दूरध्वनी बंद असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी घोषणाबाजी करीत रास्तारोको सुरू केला.
नगर-पाथर्डी महामार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. अनेकांचे बळी या रस्त्याने घेतल्याने संबंधित ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, दोन दिवसात रस्त्याचे बंद पडलेले काम सुरू करावे, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी नगरहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून संबंधित ठेकेदारास बोलावून घेऊन येथील काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत होऊन आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात अॅड. सतीश पालवे, देवराईच्या सरपंच ताराबाई क्षेत्रे, क्रांतीदलाचे विष्णूपंत पवार, संभाजीराव वाघ, विजय कारखेले, राजेंद्र पालवे, रवीभूषण पालवे, रामनाथ पालवे, किसन आव्हाड, राजू गोरे, आदिनाथ पालवे, अंकुश पालवे, संजय तेलोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.