पाथर्डीत अतिक्रमण हटवण्यासाठी रास्ता रोको : पोलिसांचा लाठीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:38 PM2018-12-13T12:38:42+5:302018-12-13T12:38:56+5:30
तहसील कायार्लायाबाहेर, शेवगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागेवर गेल्या आठवडाभरापासून झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी शेवगाव रोडवर सकाळी नऊ वाजल्यापासून रास्तारोको करण्यात आला.
पाथर्डी : तहसील कायार्लायाबाहेर, शेवगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागेवर गेल्या आठवडाभरापासून झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी शेवगाव रोडवर सकाळी नऊ वाजल्यापासून रास्तारोको करण्यात आला.
शहरात तहसील कार्यालयासमोरील, पंचायत समिती, शहरातून जाणा-या महामार्गालगतची तसेच शेवगाव रोडवरील खुल्या जागेवर अतिक्रमणे करून टप-या उभारण्यात आल्या आहेत. दोन दिवस उलटूनही महसूल, नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडून वेळीच कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त नागरिकांनी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत शेवगाव रोडवर रस्तारोको आंदोलन केले. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी तसेच इतर पोलीस फौजफाटा तात्काळ हजर झाला. यावेळी नागरिकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना धारेवर धरत शहरातील सर्वच अतिक्रमणे काढण्याची जोरदार मागणी केली. वेळीच तोडगा न निघाल्याने गेल्या दोन तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरु होते. यावेळी अतिक्रमण धारक आदिवासी महिलांनी पोलिसांवर आक्रमक चाल केली. यामुळे पोलिसांनी देखील गर्दी पांगवण्यासाठी सौम्य स्वरूपाचा लाठी मार केला. यावेळी अतिक्रमित भागात मुरूम टाकणा-या एक टिपर वाहन अडवून महिलांनी वाहन चालकाला बेदम मारहाण केली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होणा-या अतिक्रमणाच्या मुद्यावरून शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.