श्रीरामपूर तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:38 PM2018-08-09T15:38:10+5:302018-08-09T15:38:17+5:30
सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला श्रीरामपुरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला
श्रीरामपूर:सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला श्रीरामपुरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहर व तालुक्यातील व्यवहार संपूर्णपणे बंद राहिले. दुपारी शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला श्रीरामपुरात मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला. शहरातील प्रभाग दोन या मुस्लिम बहुल भागांमधील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले. व्यावसायिकांनी स्वत:हून त्यात सहभाग नोंदविला. आरक्षणासह विविध मागण्यांकरिता मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. श्रीरामपूर शहर, बेलापूर, टाकळीभान या प्रमुख ठिकणी बंद यशस्वी ठरला. टाकळीभान येथे श्रीरामपूर-नेवासे राज्यमार्गावर रास्तारोको करण्यात आला. पोलीस ठाण्यासमोरच हे आंदोलन झाले. सकाळी ९ वाजता सुरू झालेला रास्तारोको अखेर ११ वाजता मागे घेण्यात आला. शहर व तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.