माळी बाभूळगाव परिसराला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:08+5:302021-05-05T04:34:08+5:30
तिसगाव : रविवारी वादळासह पडलेल्या पावसाने घराचे पत्रे अंगावर पडून माळी बाभूळगाव (ता.पाथर्डी) येथील भोईटे वस्ती वरील आश्रू रामभाऊ ...
तिसगाव : रविवारी वादळासह पडलेल्या पावसाने घराचे पत्रे अंगावर पडून माळी बाभूळगाव (ता.पाथर्डी) येथील भोईटे वस्ती वरील आश्रू रामभाऊ भोईटे (वय ७५) हे गंभीर जखमी झाले. तरुणांनी तातडीने त्यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर, पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
रविवारी दुपारनंतर तालुक्यातील विविध गावात वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणत शेती उत्पादित मालाचे नुकसान होऊन अनेक घरांची पडझड झाली. माळी बाभूळगाव येथील भोईटे वस्तीवर राहणारे आश्रू रामभाऊ भोईटे, कांता आश्रू भोईटे, सतीश कांता भोईटे यांच्या राहत्या घराचे पत्रे वादळी उडून गेले. घराची वरवंडी पडली. यामध्ये घरात असलेले आश्रू रामभाऊ भोईटे हे गंभीर जखमी झाले आहेत. धान्यासह संसार उपयोगी सर्व वस्तुंचे पावसामुळे नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे.
आंब्याच्या कैऱ्या, डाळिंब, टरबूज, खरबूज, पपई आदी फळबागांसह कांदा, भुईमूग व इतर पिकांचेही नुकसान झाले. रस्त्यांच्या बाजूंची झाडे वादळी वाऱ्याने पडून रस्ते बंद झाले होते.
पावसाचे पाणी शेतात साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान होणार आहे. तालुक्यात वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्याचे काम उशिरापर्यंत शासकीय यंत्रणेकडून सुरू होते.
---
माळी बाभूळगाव आणि परिसरात शेतीसह राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहेत. वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत. कोरोनाच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना, त्यानंतर अवकाळी पावसासह वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी.
- सचिन वायकर,
युवक तालुकाध्यक्ष, भाजप, पाथर्डी