जामखेडमध्ये धनगर समाजाचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:45 PM2018-08-14T14:45:12+5:302018-08-14T14:45:20+5:30
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकल आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीने बाजार समितीच्या आवारातून वाजत गाजत, घोषणा देत मोर्चाने जाऊन खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
जामखेड : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकल आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीने बाजार समितीच्या आवारातून वाजत गाजत, घोषणा देत मोर्चाने जाऊन खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाची अनुसूचित जमाती मध्ये समावेश भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तरतूद करून ठेवली तरी ते आरक्षण मिळवण्यासाठी ७० वर्षांपासून संघर्ष करावा लागतो आहे. सध्याच्या सत्ताधारी सरकारने चार वर्षांपासून खेळवत ठेवले. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे लागत असल्याचे आदिवासी धनगर आरक्षण समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
सकाळी धनगर बांधवांनी छत्रपती शिवाजी बाजार समितीच्या आवारातून ढोल ताशांच्या गजरात मेंढ्यांसह मोर्चाने जाऊन खर्डा चौकात रास्तारोको केला. शालेय विद्यार्थिनी काजल भोगे, गायत्री मासाळ, अक्षिदा देवकाते, नम्रता हजारे, रंगनाथ ठोंबरे, विजय कोकाटे यांची भाषणे झाली. सकल आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीचे अक्षय शिंदे, डॉ. कैलास हजारे, विकास मासाळ, नितीन हुलगुंडे, सचिन हळनावर, संजय खरात, मोहन देवकाते, आनंद खरात, गणेश देवकाते, मारूती सजगणे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनास सकल मराठा समाजाचे संयोजक मंगेश आजबे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष अरूण जाधव, विकास राळेभात, अण्णासाहेब ढवळे, रमेश आजबे यांनी पाठिंबा दिला.