नेवासा येथे ठेवीदारांचा रस्त्यावरच ठिय्या : निबंधकांचे लेखी आश्वासन, आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:52 PM2018-07-27T18:52:12+5:302018-07-27T18:52:32+5:30
सोनई येथील श्री वेंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार शुक्रवारी दुपारी नेवासा येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर आत्मदहनासाठी जमले असता त्यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात कार्यालयाच्या समोरच अडविले.
नेवासा : सोनई येथील श्री वेंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार शुक्रवारी दुपारी नेवासा येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर आत्मदहनासाठी जमले असता त्यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात कार्यालयाच्या समोरच अडविले. त्यामुळे ठेवीदारांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने चाचणी लेखा परिक्षणाचा अहवाल आल्यानंतर संचालक मंडळावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन सहायक निबंधक यांनी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
सोनई येथील श्री वेंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंसंस्थेमध्ये घोटाळा झाला असून ठेवीदारांचे सुमारे कोट्यावधी रुपये अनेक महिन्यापासून अडकले आहेत. याबद्दल ठेवीदारांनी गेले दोन वर्षे अनेकदा निवेदने व आंदोलने केली मात्र अद्याप ठेवी परत मिळाल्या नाहीत तसेच मागील दोन महिन्यांपूर्वी एक ठेवीदारांने सहायक निबंधकांसमोर विष प्राशन करण्याचा प्रयन्त केला होता. दरम्यान संस्थेच्या चौकशीसाठी त्रीसदस्य समिती केली होती तसेच लेखा परीक्षण ही करण्यात आले. त्यात कर्मचारी, पदाधिकारी दोषी आढळले पण फक्त कर्मचा-यांवरच कारवाई झाली. संचालकांवर कुठलीही कारवाई झालेली नसल्याने संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावे, ही प्रमुख मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. संस्थेची चाचणी लेखा परीक्षण पूर्ण करून पंधरा दिवसात अहवाल सादर होणार आहे. सदर अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन विशेष लेखा परीक्षक एस.डी.कुलकर्णी व सहायक निबंधक दीपक नागरगोजे यांनी ठेवीदारांना दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी अभय भळगट, विष्णू वीरकर,रामभाऊ सुद्रीक,सुभाष लुनिया,महावीर दरक,संजय खंडागळे,आशा कुलकर्णी,मीना भालेराव यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते. या आंदोलनावेळी नेवाशाचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे व सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी नेवासा व सोनई पोलीस ठाण्याच्या मोठा बंदोबस्त तैनात केला होता.