संचारबंदीची शहरात कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:27+5:302021-03-29T04:15:27+5:30

अहदमदनगर : जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबदी लागू करण्याचा आदेश दिला असून, नगर शहरात संचारबंदीच्या ...

Strict enforcement of curfew in the city | संचारबंदीची शहरात कडक अंमलबजावणी

संचारबंदीची शहरात कडक अंमलबजावणी

अहदमदनगर : जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबदी लागू करण्याचा आदेश दिला असून, नगर शहरात संचारबंदीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पथके वाढवून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी रविवारी दिला.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी रविवारी संचारबंदीबाबतचा आदेश जारी केला. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनीही शहरातील पथकांचा आढावा घेऊन आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. याविषयी माहिती देताना गोरे म्हणाले, महापालिकेची चार भरारी पथके गेल्या १५ दिवसांपासून शहरात फिरत आहेत. यामध्ये मनपाचे प्रमुख अधिकारी व पोलिसांचाही समावेश आहे. हे पथक शहरातील गर्दीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करत आहेत. यापूर्वी दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, यासाठी रात्री ९ वाजेपर्यंत मुदत होती. ती कमी करून सायंकाळी ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून या आदेशाची अंमलबाजवणी होईलच. पण, महापालिकेची पथकेही वाढविण्यात येतील. सध्या करवसुली सुरू आहे. मार्चअखेरीस वसुलीचे कर्मचारीही कोरोनाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी घेतले जातील, असे गोरे म्हणाले.

शहरातील भाजी मार्केट, खाद्यपदार्थांचे स्टॉल, दुकाने आदी ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वत:हून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महापालिकेकडून योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन गाेरे यांनी केले आहे.

.....

कोरोना चाचण्यांसाठी नाशिक येथील संस्थेशी करार

जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून स्त्रवाचे नमुने तपासणीसाठी येतात. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा यंत्रणेवर ताण येतो तसेच अहवाल येण्यास विलंब होतो. त्यामुळे शहरातील रुग्णांच्या स्रवाचे नमुने घेऊन ते नाशिक येथील खासगी प्रयोगशाळेत पाठविले जातील, याबाबत संबंधित संस्थेशी लवकरच करार करण्यात येईल. स्रवाचे नमुने महापालिकाच घेणार असल्याने तांत्रिक कर्मचारी मानधनावर घेतले जाणार असून, कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर आणखी चाचणी सेंटर्स सुरू करण्यात येणार असल्याचेही गोरे म्हणाले.

Web Title: Strict enforcement of curfew in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.