अधिकार्‍यांना कोंडून राज्यमार्गरोखला

By Admin | Published: March 2, 2015 01:25 PM2015-03-02T13:25:08+5:302015-03-02T13:25:08+5:30

नेवासा तालुक्यातील खरवंडी व परिसरात अजुनही मुळा पाटपाण्याचे रोटेशन न पोहोचल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी अधिकार्‍यांना कोंडून नगर-औरंगाबाद महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

Strike the officials and shout the state | अधिकार्‍यांना कोंडून राज्यमार्गरोखला

अधिकार्‍यांना कोंडून राज्यमार्गरोखला

नेवासा : नेवासा तालुक्यातील खरवंडी व परिसरात अजुनही मुळा पाटपाण्याचे रोटेशन न पोहोचल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी अधिकार्‍यांना कोंडून नगर-औरंगाबाद महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले.
माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी जि.प. सदस्य अजित फाटके, प्रकाश उंदरे, संभाजी मुरकुटे, मुकुंद भोगे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
मुळा पाटबंधारेच्या वडाळा बहिरोबा शाखेअंतर्गत असलेल्या चारी ५ व ६ वरील शेतकरी आवर्तन सुरु झाल्यापासून पाण्यासाठी आग्रही होते. मागील आवर्तन काळात या चारीवरील शेतकर्‍यांना अजिबात पाणी न मिळाल्याने जानेवारी महिन्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके करपत आहेत. अधिकार्‍यांकडून आश्‍वासनाशिवाय काहीच मिळत नसल्याने वडाळा बहिरोबा, निपाणी निमगांव, खरवंडी येथील संतप्त शेतकर्‍यांनी वडाळा बहिरोबा शाखा कार्यालयात नेवासा उपविभागाचे उपअभियंता नवलाखे, शाखाधिकारी के.सी.दुशिंग, एस. के. शेळके, आर.बी.पळघडमल यांच्या कार्यालयास कुलूप ठोकून शनिवारी सकाळपासूनच त्यांना कोंडले.
मुळा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता ए.एस.वडार यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती देऊनही उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येताच शेतकर्‍यांनी शाखा कार्यालयासमोर नगर-औरंगाबाद महामार्गावर ठाण मांडले. 
संभाजीराव फाटके यांनी अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाल्याचे सांगून कालवा सल्लागार समितीच्या चुकीच्या नियोजनामुळे ही वेळ आल्याचा आरोप केला. मुळा धरणाच्या निर्मितीच्यावेळी बारमाही पाणी पुरवठय़ाचे नियोजन होते. ते गेल्या काही वर्षात दोन आवतर्नावर आलेच कसे? असा सवालही त्यांनी केला. 
अधिकारी राजकारण्यांच्या हातचे कळसूत्नी बाहुली असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप अजित फाटके यांनी केला. मुकुंद भोगे यांचेही भाषण झाले. आंदोलनात प्रकाश उंदरे, संभाजी मुरकुटे,आबासाहेब फाटके, बाबासाहेब फाटके, खरवंडीचे सरपंच सिद्धार्थ भोगे, पोलीस पाटील संदीप फाटके तसेच तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. 
(तालुका प्रतिनिधी)

■ मुळा पाटपाण्याच्या रोटेशनप्रश्नी नगर-औरंगाबाद महामार्गावर सुरु करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रसंगी आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. मुळा पाटबंधारेचे उपअभियंता नवलाखे यांनी सोमवारपासून चारी ५ व ६ ला पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.  

Web Title: Strike the officials and shout the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.