स्ट्राँगरूमला थ्री टायर सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:35 PM2019-05-07T12:35:22+5:302019-05-07T12:44:06+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक शाखा, पोलीस यंत्रणा, तसेच संबंधित उमेदवार निवांत झाले असले तरी मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉँगरूमच्या सुरक्षेत मात्र २४ तास खडा पहारा सुरू आहे.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक शाखा, पोलीस यंत्रणा, तसेच संबंधित उमेदवार निवांत झाले असले तरी मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉँगरूमच्या सुरक्षेत मात्र २४ तास खडा पहारा सुरू आहे. सीआरपीएफ, एसआरपीएफ व जिल्हा मुख्यालयातील पोलीस अशा ‘थ्री टायर सुरक्षे’त (७५ जवान) ही स्ट्राँगरूम बंदिस्त झाली आहेत. तब्बल २५ राजपत्रित अधिकारी टप्प्याटप्प्याने यावर देखरेख करीत असून, जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून सकाळ-संध्याकाळ पाहणी केली जात आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २३, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान झाले. त्यानंतर या दोन्ही मतदारसंघातील मतदान यंत्रे एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली. २३ मे रोजी मतमोजणी होणार असून तोपर्यंत या मतदान यंत्रांची काळजी घेतली जात आहे. स्ट्रॉँगरूमच्या सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्याचे मॉनेटरिंग गेटवर ठेवण्यात आले आहे. ते संबंधित राजकीय पक्षांनाही पाहता येईल. प्रवेशद्वारावरच २४ तास व्हीडीओ शुटिंगची व्यवस्था करण्यात आली असून येथे येणाºया प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. कर्मचाºयांसाठी भोजन घेऊन येणारे केटरर्स, साफसफाई कामगार, तसेच दिवसभरात कोणी अधिकारी येणार असेल तर सर्वांची चौकशी होते, तसेच त्याचे शुुटिंग केले जाते.
विविध विभागातील तब्बल २५ राजपत्रित अधिकाºयांची या सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली असून, एकेक करून प्रत्येक अधिकारी आठ तास येथे ठाण मांडून असतो. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे व संबंधित सहायक निवडणूक अधिकारी सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतात.
अग्नीशमन यंत्रणाही येथे २४ तास सज्ज आहे.
१५ हजार यंत्रे
अहमदनगर मतदारसंघात दोन हजार, तर शिर्डी मतदारसंघात १७०० मतदान केंद्रे होती. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट व एक व्हीव्हीपॅट असे चार यंत्रे होती. प्रत्यक्ष मतदानावेळी अनेक यंत्रे बदलण्यात आली. त्यामुळे ही सर्व मिळून सुमारे १५ हजार यंत्रे स्ट्राँगरूममध्ये बंदिस्त आहेत.