मुंडे-राजळे भेटीत विधानसभेची व्यूहरचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 01:25 PM2019-09-25T13:25:59+5:302019-09-25T13:27:18+5:30
निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांच्यात विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंडे-राजळे यांनी मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेवगाव : निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांच्यात विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंडे-राजळे यांनी मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात गत विधानसभेला मोनिका राजळे यांनी विजय मिळविला. त्यांनी गत पाच वर्षात मतदारसंघात बांधणी केली आहे. राजीव राजळे यांच्या निधनानंतरही त्यांनी दोन्ही तालुक्यातील संपर्क कायम ठेवला आहे. यावेळी या मतदारसंघावर राष्टवादीनेही लक्ष केंद्रीत केले आहे. वंजारी समाजातून काही कार्यकर्त्यांनी मुंडे यांची स्वतंत्र भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. वंजारी मतांचे विभाजन कसे होईल यावर राष्टवादीची गणिते अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे व राजळे यांची भेट महत्त्वाची मानली जाते. मुख्यमंत्र्यांनी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाची जबाबदारी मुंडे यांच्यावर सोपवलेली आहे. त्यामुळे मुंडे व राजळे यांनी मोर्चेबांधणीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
या भेटीप्रसंगी पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, पंचायत समिती सदस्या मनिषा वायकर, सुनील ओहोळ, सुभाष केकाण, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, पाथर्डीचे उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रवीण राजगुरु, रमेश गोरे, नामदेव लबडे, काशिताई गोल्हार, ज्योती मंत्री, मंगल कोकाटे, रमेश हंडाळ, अनिल बोरुडे, चारुदत्त वाघ, नारायण पालवे, संदीप पठाडे, शिवनाथ मोरे आदी कायकर्ते यावेळी उपस्थित होते.