रेमडेसिविरसाठी जीवाचा आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:25+5:302021-04-12T04:18:25+5:30
केडगाव : केडगावमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या अनियंत्रित होत असतानाच आता या रुग्णांना आवश्यक असणारे रेमडेसिविर इंजेक्शन शोधूनही ...
केडगाव : केडगावमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या अनियंत्रित होत असतानाच आता या रुग्णांना आवश्यक असणारे रेमडेसिविर इंजेक्शन शोधूनही मिळत नाही. इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक केडगावमध्ये थेट रस्त्यावर उतरले. पोलिसांनी मध्यस्थी केली तरीही रुग्णांना इंजेक्शन मिळाले नाहीत.
केडगावमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण परिसरात सध्या ५०० पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय असून केडगावमधील विविध खासगी दवाखान्यात जवळपास ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. केडगावमधील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना सध्या तीन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. वेळेत इंजेक्शन मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे उपचार अर्धवट आहेत.
इंजेक्शन अभावी उपचार पूर्ण होत नसल्याने रुग्णांना घरी सोडले जात नाही. गेल्या दोन दिवसांपासून केडगावमध्ये रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन मिळविण्यासाठी आटापिटा करीत आहेत. अनेकजण रात्रभर फिरून इंजेक्शन कुठे मिळते का याचा शोध घेत होते. मात्र एवढे करूनही रुग्णांना काल रात्रीपर्यंत इंजेक्शन मिळू शकले नाही.
केडगावमधील अधिकृत औषध विक्रेत्यांने सकाळी इंजेक्शन मिळेल असे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितल्याने आज भल्या सकाळपासूनच रुग्णांच्या नातेवाईकांनी केडगावमधील नरेंद्र मेडिकल स्टोअरमध्ये गर्दी केली. मात्र, साडे दहा वाजून गेले तरी मेडिकल न उघडल्याने नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी नगर - पुणे रस्त्यावरच ठिय्या मांडत आपला संताप व्यक्त केला.
कोतवाली पोलिसांनी मध्यस्थी करीत मेडिकल चालकाला बोलावून घेतले. आमच्याकडे रात्री आलेले सर्व इंजेक्शन आम्ही औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून रात्रीतूनच वाटून टाकले असे स्पष्टीकरण मेडिकल चालकाने दिले. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांचे समाधान होत नसल्याने शेवटी कोतवाली पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी मेडिकल चालकाला आपल्या ताब्यात घेतले.
मात्र, एवढे करूनही शेवटी रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन न मिळाल्याने त्यांची वणवण सुरूच होती.
........
केडगावमधील वाढती रुग्णसंख्या पाहता येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होत आहे. काही चालक कृत्रिम तुटवडा भासवत जादा दराने त्याची विक्री करीत आहेत. इंजेक्शनच्या या काळ्या बाजारात गोरगरीब रुग्णांचे विनाकारण हाल सुरू आहेत. प्रशासनाने यात लक्ष घातले नाही तर लोकांचा संयम सुटू शकतो.
- विठ्ठल महाराज कोतकर, संस्थापक, माणुसकी फाऊंडेशन, केडगाव
..........
११ केडगाव
छाया : इंजेक्शन मिळत नसल्याने केडगावमधील रुग्णांचे नातेवाईक शेवटी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले ( छाया : योगेश गुंड