संघर्षशील नेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:20 AM2021-03-18T04:20:12+5:302021-03-18T04:20:12+5:30

गांधी हे अल्पसंख्याक समाजातून पुढे आले. नगर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या मातब्बर आहे. अशा ठिकाणी अल्पसंख्याक नेत्याने आपले पाय रोवणे ...

Struggling leader | संघर्षशील नेता

संघर्षशील नेता

गांधी हे अल्पसंख्याक समाजातून पुढे आले. नगर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या मातब्बर आहे. अशा ठिकाणी अल्पसंख्याक नेत्याने आपले पाय रोवणे हे कठीण काम होते. मात्र, गांधी यांनी जातीपातीची भिंत भेदत राजकारण केले. त्यांचा कोणत्याही समाजाने कधी द्वेष केला नाही. ते भाजपमध्ये होते व हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते. मात्र, तरी त्यांचे मुस्लीम समाजातही तितकेच सलोख्याचे संबंध होते. त्यांची भाषा विखारी नव्हती.

राजकारण हे श्रीमंतांचे काम आहे. आमदार, खासदार होण्यासाठी तुमच्या पाठीशी मोठ्या संस्था हव्यात, असा अनेकांचा समज आहे. मात्र, गांधी यांनी या सर्व बाबींना छेद दिला. अवघे दहावी शिक्षण असलेल्या गांधी यांनी ज्युसची गाडी सुरू करत व्यवसायाचा आरंभ केला. पुढे जनसंघाच्या व भाजपच्या माध्यमातून राजकारणात आलेले गांधी हे सतत मोठे आव्हान पेलत गेले. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच त्यांनी नगरचे लोकप्रिय नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून केली. त्या निवडणुकीत ते विजयी झाले. पुढे नगरपालिकेत उपनगराध्यक्ष झाले.

१९९९ साली खासदारकीची पहिली निवडणूक लढवली व ते विजयी झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय जहाजबांधणी मंत्री झाले. केंद्रात त्यांनी उत्तम संबंध प्रस्थापित केले होते. अटलबिहारी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू, नितीन गडकरी या भाजप नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. या सर्व नेत्यांकडे त्यांचा चांगला वावरही होता. दिल्लीत त्यांचा रुबाब होता. तेथे वावरताना एक आत्मविश्वासही त्यांच्यात दिसत होता. १९९९, २००९ व २०१४ अशा तीन निवडणुकांमध्ये ते लोकसभेत पोहोचले. भाजपच्या अंतर्गत कुरघोड्यांतून २००४ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारून ना. स. फरांदे यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली गेली. गांधी यांचे दिल्लीत वजन वाढू नये यासाठी काही नेत्यांनी मुद्दामहून हे षड्‌यंत्र केले होते. मात्र, त्याची किंमत भाजपला चुकवावी लागली. भाजपने ही निवडणूक गमावली. पक्षाने तिकीट नाकारले, मात्र गांधी यांनी पक्ष सोडला नाही. २०१९ च्या निवडणुकीतही पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारत ऐनवेळी पक्षात आलेल्या सुजय विखे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गांधी यांच्यावर एकप्रकारे पुन्हा अन्याय झाला. मात्र, तरीही त्यांनी भाजपची साथ सोडली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत ते पक्षासोबत एकनिष्ठ राहिले.

खासदार असताना त्यांचा मतदारसंघात अगदी गावपातळीवर सामान्य कार्यकर्त्याशी संपर्क होता. व्यापारी व शेतकरी अशा दोन्ही घटकांशी संबंध ठेवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. पक्षसंघटनेतही जिल्हा सरचिटणीस ते जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. कुठलाही कार्यक्रम आखताना तो भव्यदिव्य व आखीव रेखीव कसा होईल यावर त्यांचा कटाक्ष असे. संघटनेवर सतत आपली पकड ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळे त्यांचा संघर्ष हा विरोधी पक्षांऐवजी सेना-भाजपच्या नेत्यांशीच अधिक झाला. मात्र, त्याची त्यांनी तमा बाळगली नाही. शिवसेनेचे अनिल राठोड व गांधी यांच्यातही मोठा संघर्ष असायचा. अर्थात, या दोघांनाही व्यापक जनाधार व मान्यता होती. दुर्दैवाने कोरोनाने हे दोन्ही नेते नगरकरांपासून हिरावले.

नगर अर्बन बँंकेचे अध्यक्षपदही गांधी यांनी भूषविले. ही बँंक अलीकडे अडचणीत आली आहे. तिच्यावर प्रशासक आल्याने गांधी यांच्यावर टीका झाली. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष होण्याच्या अगोदरच त्यांनी हे जग सोडले. गांधी हे स्वभावाने दिलदार होते. नगरच्या विकासासाठी त्यांनी अनेक दिल्लीवारी केल्या. मात्र, त्यांनी अखेरचा विसावाही दिल्लीत घ्यावा ही चटका लावणारी बाब आहे.

- सुधीर लंके

Web Title: Struggling leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.