लॉकडाऊनमध्ये एसटीचे चाक ‘पंक्चर’; दोन महिन्यांत ४२ कोटींचे उत्पन्न बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:12 PM2020-05-23T13:12:35+5:302020-05-23T13:13:30+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेले लॉकडाऊन. त्यामुळे एसटी बस बंद करण्याचा निर्णय आणि त्याचा परिणाम नगर विभागाचे दररोजचे बुडालेले ७० लाखांचे उत्पन्न. यावरून दोन महिन्यांचा हिशोब केला तर तब्बल ४२ कोटींचा फटका एसटी महामंडळाच्या नगर विभागाला बसला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात चाललेले एसटीचे चाक आता पुरते ‘पंक्चर’ झाले आहे.
चंद्रकांत शेळके ।
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेले लॉकडाऊन. त्यामुळे एसटी बस बंद करण्याचा निर्णय आणि त्याचा परिणाम. नगर विभागाचे दररोजचे बुडालेले ७० लाखांचे उत्पन्न. यावरून दोन महिन्यांचा हिशोब केला तर तब्बल ४२ कोटींचा फटका एसटी महामंडळाच्या नगर विभागाला बसला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात चाललेले एसटीचे चाक आता पुरते ‘पंक्चर’ झाले आहे.
कोरोनाचा फटका सर्वच उद्योगधंदे, रोजगाराला बसला असून गेल्या दोन महिन्यांपासून जागेवर उभ्या असलेल्या बसमुळे एसटी महामंडळही कमालीचे अडचणीत सापडले आहे.
खासगी प्रवासी वाहतुकीचे अतिक्रमण, वाढलेले डिझेलचे भाव, जुन्या झालेल्या गाड्या यामुळे आधीच एसटी बससेवा तोट्यात सुरू होती. त्यात लॉकडाऊन जाहीर होऊन सर्वच बस बंद करण्याचा निर्णय झाल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला.
केवळ नगर विभागाचा विचार केला, तर जिल्ह्यातील ११ आगारांच्या एकूण ७०० बस दररोज रस्त्यांवर धावतात. जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा व आंतरराज्य अशा एकूण ४२०० फेºया दररोज नगर जिल्ह्यातून होत होत्या. त्यापोटी नगर विभागाला दररोजचे सरासरी ७० लाखांचे उत्पन्न मिळत होते.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे २१ मार्चपासून सर्व बस आगारात उभ्या आहेत. तब्बल दोन महिने जागेवर उभी राहिल्याने बसचा मेंटेनन्सही वाढला आहे.
दरम्यान, तब्बल दोन महिन्यांनंतर २२ मेपासून राज्यात बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बसमध्ये केवळ ५० टक्केच प्रवाशांना बसण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बसला ५० टक्के कमी प्रवाशात म्हणजे तोट्यात या बस चालवाव्या लागणार आहेत. एकूणच बस बंद असतानाही तोटा व आता बस सुरू झाल्या तरी तोटा अशा दुहेरी पेचात सध्या बससेवा सापडली आहे.
महामंडळाला दुहेरी फटका
एकीकडे बस बंद असल्याने दररोज होणारे कोट्यवधींचे नुकसान, तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये सर्व कर्मचा-यांचा करावा लागणारा पगार असा दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसला आहे.
नगर विभागाचे दररोजचे सरासरी ७० लाखांचे उत्पन्न होते. ते या लॉकडाऊनमध्ये बुडाले. दरम्यानच्या काळात शेकडो बसमधून नगर जिल्ह्यातून परप्रांतीयांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. आता बस सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तोटा होत असला तरी सेवा देणे हे महामंडळाचे कर्तव्य आहे, असे अहमदनगरचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी संगितले.