एसटीचे स्मार्ट कार्ड फेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 05:25 PM2019-07-06T17:25:46+5:302019-07-06T17:26:37+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लाभार्थींना दिलेले स्मार्ट कार्ड संकटात सापडले आहे़ कार्डावर चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव चुकल्याचे अचानक लक्षात आल्याने पुन्हा कार्ड मागवून घेण्यात आले आहे़

 STT smart card fails! | एसटीचे स्मार्ट कार्ड फेल!

एसटीचे स्मार्ट कार्ड फेल!

भाऊसाहेब येवले
राहुरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लाभार्थींना दिलेले स्मार्ट कार्ड संकटात सापडले आहे़ कार्डावर चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव चुकल्याचे अचानक लक्षात आल्याने पुन्हा कार्ड मागवून घेण्यात आले आहे़ एका खाजगी कंपनीने केलेल्या चुकीमुळे महात्मा गांधी यांचे नाव चुकल्याने खळबळ उडाली़ कंपनीने नाव दुरूस्ती केल्यानंतर महिनाभराने स्मार्ट कार्ड मिळणार असल्याचे सांगण्यात आले़
महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार दरवर्षी दिले जातात़ पाच महिन्यापूर्वी लाभार्थींना साधे कार्ड एस़टी़महामंडळाने दिले होते़ स्मार्ट कार्डसाठी लाभधारकांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती़ त्यानुसार औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त लाभार्थींना स्मार्ट कार्ड वाटण्याचे काम सुरू झाले होते़
महात्मा गांधींचे नाव चुकल्याचे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले़ त्यामुळे लाभधारकांकडून तातडीने स्मार्ट कार्ड मागविण्यात आले़ ज्याठिकाणी स्मार्ट कार्ड वितरण झाले नाही, त्या ठिकाणाहून परिवहन महामंडळाकडे कार्ड पाठविण्यात आले़

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड वितरण राज्यात काही ठिकाणी केले होते़ महात्मा गांधी यांचे नाव चुकल्याचे महामंडळाच्या लक्षात आले़ त्यामुळे कार्ड मागे घेण्यात आले आहे़ स्मार्ट कार्ड येईपर्यंत जुन्या कार्डला मुदतवाढ देण्यात येणार आहे़ -झुंबरराव खराडे, पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते, पुणे.

जुन्या कार्डवर प्रवासाची संधी
पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पुन्हा जुन्या पध्दतीचे कार्ड देण्यात येणार आहे़ स्मार्ट कार्ड उपलब्ध होईपर्यंत जुन्या कार्ड पध्दतीने लाभार्थींना प्रवास संधी मिळणार असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़ स्मार्ट कार्ड राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट कार्ड उपक्रमाअंतर्गत फिनो बँकेने जारी केले आहे. कार्डावर १६ अंकी नंबरही देण्यात आला होता़

 

Web Title:  STT smart card fails!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.