डीजेच्या गोंगाटावर नाचताना विद्यार्थ्याचा मृत्यू? पुणतांबा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 05:44 AM2024-03-01T05:44:06+5:302024-03-01T05:44:14+5:30
कृषी तंत्र विद्यालयात प्रकार, प्राचार्यांकडून खंडन
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पुणतांबा येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या एका विद्यार्थ्याचा निरोप समारंभातील डीजेच्या गोंगाटामुळे मृत्यू झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मात्र डीजेचा आवाज नियंत्रणात होता व मृत्यूचे कारण वेगळे असू शकते, असा दावा केला आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली.
राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील सुयोग कैलास अडसुरे (वय २०) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कृषी विद्यालयाच्या पदविका अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. तो पुणतांबा येथे विद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता.
प्राचार्यांनी फेटाळला दावा
nप्राचार्य अविनाश गायकवाड यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी खूप आग्रह केला. शेवटचे वर्ष असल्याने
डीजे लावण्याची मागणी केली.
nमात्र, त्यावरील आवाज नियंत्रणात होता. घडलेली
घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, मृत्यूचे कारण डीजेशी संबंधित नाही.
निरोप समारंभात लावला डीजे, आवाजाने छातीत झाला त्रास
विद्यालयाची शुक्रवारपासून परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे निरोप समारंभामध्ये डीजे लावण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुसार गावातील एक डीजे तेथे लावण्यात आला.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हा निरोप समारंभ आयोजित केला होता. दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांचे नाचगाणे सुरू झाले. याच वेळी सुयोग याला छातीत त्रास जाणवू लागला. त्याला पुणतांबा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
तेथून पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सुयोग याला मृत घोषित करण्यात आले.