फी न भरल्याने विद्यार्थ्यास वडगाव पान येथील शाळेतून हाकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 06:56 PM2018-07-02T18:56:36+5:302018-07-02T18:57:07+5:30
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील लोट्स इंग्लिश मीडियम स्कूलमधून एका सातवीच्या शालेय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतून हाकलून देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याबद्दल संबंधित पालकाने संगमनेर येथील गटशिक्षणाधिका-यांकडे तक्रार दाखल केलेली आहे.
संगमनेर : तालुक्यातील वडगाव पान येथील लोट्स इंग्लिश मीडियम स्कूलमधून एका सातवीच्या शालेय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतून हाकलून देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याबद्दल संबंधित पालकाने संगमनेर येथील गटशिक्षणाधिका-यांकडे तक्रार दाखल केलेली आहे.
लोट्स स्कूलच्या मुख्याध्यापकांनी सातवीतील एका विद्यार्थ्यास फीचे एक लाख रुपये घेऊन ये, अन्यथा, तुला शाळेत बसून दिले जाणार नाही, असे सांगून विद्यार्थ्यास शाळेतून हाकलून दिले. यामुळे तो विद्यार्थी आठ दिवसांपासून शाळेत न जाता घरीच थांबत आहे. ज्या विद्यार्थ्यांची फी भरावयाची बाकी आहे, त्यांना संस्थेच्या मालकीच्या स्कूल बसमध्ये बसू न देण्याचे आदेश बस चालकाला दिले आहेत. त्याचप्रमाणे शाळेची टप्प्याटप्प्याने फी भरणाºया पालकांकडून कोरे सहीचे धनादेश घेतले जातात. नंतर त्या पालकांचे धनादेश मुद्दाम बँकेत वटवून त्यांना कोर्ट कचेरीची धमकी दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांची फी भरावयाची राहिली, अशा विद्यार्थांना घटक चाचणीला बसू न देता वर्गाबाहेर हाकलून दिले जाते. विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रास देऊन छळवणूक केली जात आहे, असे पालक रामनाथ बोºहाडे यांनी गटशिक्षणाधिका-यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
शाळेची फी न भरल्यामुळे कोणत्याही शिक्षण संस्थांनी विद्यार्थांना घरी पाठवू नये किंवा शालेय साहित्य खरेदी करण्यास सक्ती करू नये. याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संबंधित केंद्र प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच तथ्य आढळल्यास संबंधित संस्थेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी, संगमनेर.
आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून बाहेर हाकलून दिलेले नाही किंवा आमच्याकडून कोणत्याही विद्यार्थास परीक्षेच्या कालखंडात फी न भरल्यामुळे वर्गाच्या बाहेर बसून दिले जात नाही. आम्ही शासनाच्या नियमानुसार शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे.
- नीलिमा निघुते, संस्थापक सदस्य, लोट्स इंग्लिश मीडियम स्कूल, वडगाव पान.
शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय फीबाबत व आरटीई नियमानुसार कोणत्या विद्यार्थ्याला शालेय आर्थिक वर्षात मोफत प्रवेश दिला गेला. पालकांना सध्या कागदावर शाळेची फी भरल्याची पावती दिली जाते. त्यामुळे निश्चित फीबाबत पालक संभ्रमावस्थेत आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करावी.
-रामनाथ बो-हाडे, पालक