सर्व्हर बंद असल्याने विद्यार्थी-पालकांची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:37 PM2019-06-21T12:37:08+5:302019-06-21T12:37:19+5:30
राज्यातील अभियांत्रिकीसह, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर झाले असले तरी आता पुढील प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अहमदनगर : राज्यातील अभियांत्रिकीसह, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर झाले असले तरी आता पुढील प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कारण गेल्या तीन दिवसांपासून या प्रवेश प्रक्रियेसाठी असलेले सर्व्हर बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
बारावीच्या निकालानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचा निकाल जाहीर झाला. या सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारे व्यावसायिक पदवी
अभ्यासक्रमाची आॅनलाईन नोंदणी व शैक्षणिक कागदपत्र पडताळणीसाठी जिल्ह्यात तेरा महाविद्यालयांत सेतू केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. परंतु गेल्या तीन दिवसांपासून एकदम आलेला भार सहन न होऊन हे सर्व्हर वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे लांबून आलेल्या विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल होत आहेत. काही विद्यार्थी-पालक तर बारा-बारा तास सर्व्हची वाट पाहत बसत आहेत. सीईटी सेलकडून यासंबंधीची माहिती वेळेवर विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गुरूवारी सीईटी सेलने एक निवेदन प्रसिद्ध करत हे सर्व्हर २२ जूनपासून सुरळीत सुरू होईल, असे कळवले आहे.
मुलांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने आम्ही सुट्या घेऊन येत आहोत. गेल्या तीन ेिदवसांपासून मी गेवराईवरून येत आहे. पण रोजच सर्व्हर डाऊन असल्याचे ऐकायला मिळते.- लक्ष्मीकांत शिर्के, पालक
या सर्व्हर डाऊनमुळे काम तर काही होत नाही, परंतु काम करण्यापेक्षा पालकांना उत्तरे देण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांनाही त्रास सहन करावा लागतोे. - डॉ. हेमंत जाधव, शिक्षक
तीन दिवसांपासून रोज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येत आहे. परंतू सर्व्हर डाऊन असल्याने रोज हेलपाटे मारावे लागतात.- स्नेहल शेळके, विद्यार्थिनी