दरेवाडीत दारूबंदीसाठी विद्यार्थी मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:02 PM2018-09-26T13:02:32+5:302018-09-26T13:04:00+5:30

ज्या वयात मुलांवर योग्य संस्कार करायचे, त्या वयात मुलांच्या कानावर घरातील भांडणे, तंटे पाहण्याची वेळ येते.

Students in Dewrodi | दरेवाडीत दारूबंदीसाठी विद्यार्थी मैदानात

दरेवाडीत दारूबंदीसाठी विद्यार्थी मैदानात

अहमदनगर : ज्या वयात मुलांवर योग्य संस्कार करायचे, त्या वयात मुलांच्या कानावर घरातील भांडणे, तंटे पाहण्याची वेळ येते. रस्त्यावर दारूडे धिंगाणा घालतात, तर बाहेर टुकार टोळके शाळेभोवती घिरट्या घालून मुलींना त्रास देतात. वारंवार होणाऱ्या या घटनांना कंटाळून दरेवाडी येथील शालेय मुलांनीच दारूडे पकडून देण्याची मोहीम राबवली. त्यासाठी मोठ्या धैर्याने पोलिसांना पाचारण केले व त्यांना दारूअड्डे दाखवले. विद्यार्थ्यांच्या या धाडसाचे गावातून कौतुक होत आहे.
नगर तालुक्यातील दरेवाडी येथे ग्रामपंचायतीकडून दारूबंदीचा ठराव मंजूर झालेला आहे. परंतु तरीही काहीजण विनापरवाना दारूविक्री करतात. त्यामुळे गावातील वातावरण बिघडले आहे. अनेक कुटुंबांत कलहाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ लागल्याने त्यांनी थेट ग्रामपंचायत व भिंगार पोलीस ठाण्याला पत्र लिहून तक्रार केली. त्याची दखल घेत भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप पाटील फौजफाट्यासह गावात दाखल झाले. पाचवी ते आठवीतील सुमारे १५-२० विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. गावातील दारूअड्डे, जुगारअड्डे उद्धवस्त करा. त्याचा आम्हाला खूप त्रास होतो. गावातील तरूण पिढीही व्यसनाधिन होत आहे. रात्री उशिरा हे तरूण रस्त्यावर धिंगाणा घालतात. मळगंगा हायस्कूलमध्येही शाळा सुटल्यावर टुकार टोळके जमा होते. गुटखा खाऊन थुंकणे, मोठ्याने शिव्या देणे, मुलींबाबत शेरेबाजी करणे असे प्रकार सुरू असतात, अशी तक्रार मुलींनी केली. मुलांनी काही दारूविक्रेत्यांची नावे व दारूविक्रीची ठिकाणे पोलिसांना सांगितली. पोलीस पथकाने त्वरित संबंधित ठिकाणी जाऊन दोघांना ताब्यात घेतले, तर इतर काहीजण पोलीस आल्याचे पाहून पसार झाले. पोलीस निरीक्षक पाटील व सरपंच अनिल करांडे यांनी या मुलांच्या धाडसाचे व त्यांच्या कल्पनेचे कौतुक केले व यापुढे कोणी गावात दारू विकताना किंवा मद्यपान केलेला आढळला तर त्याला जागेवरच चोप देण्याची मोहीम सुरू करण्याची ग्वाही दिली.

आमच्याकडे दारूसंदर्भात अनेक तक्रारी येतात. परंतु विद्यार्थ्यांनी दारूबंदीसाठी केलेली तक्रार पहिलीच असावी. खरं तर प्रत्येक पालकाने, ग्रामस्थाने याचा गंभीर विचार करण्याची गरज आहे. या चिमुकल्यांनी उठवलेला आवाज खरंच कौतुकास्पद आहे. पोलीस लागेल ती मदत त्यांना करतील. -संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, भिंगार ठाणे

विद्यार्थ्यांना घेऊन उद्यापासून गावात दारूबंदीसाठी जनजागृती फेरी काढणार आहोत. दारूबंदीचा ठराव ग्रामपंचायतीने मागेच केला आहे. परंतु चोरून दारूविक्री होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तक्रार करणा-या विद्यार्थ्यांना कोणी धमकावले तर त्यांचा समाचार गावपातळीवर घेतला जाईल. पोलिसही मदतीला आहेतच. -अनिल करांडे, सरपंच, दरेवाडी

Web Title: Students in Dewrodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.