कर्जत तालुक्यातील घुमरी गावातील विद्यार्थी गिरवाताहेत उघड्यावर धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:27 PM2017-09-19T13:27:05+5:302017-09-19T13:27:05+5:30
कर्जत तालुक्यातील घुमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक झाली असल्याने या शाळेतील दोन वर्ग उघड्यावर भरविण्यात येत आहेत
कर्जत : कर्जत तालुक्यातील घुमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक झाली असल्याने या शाळेतील दोन वर्ग उघड्यावर भरविण्यात येत आहेत. विद्यार्र्थी उघड्यावर बसत असल्याने तातडीने नवीन इमारतीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
निंबोडी येथील दुर्घटननेनंतर या शाळेच्या इमारतीची पाहणी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी केली. दहा बारा वषार्पूर्वीच्या दोन स्लॅबच्या खोल्या अत्यंत धोकादायक झालेल्या असल्याने या खोल्यामध्ये वर्ग बसवू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्या वीस दिवसापासून हे दोन वर्ग उघड्यावर भरत आहे. पावसामुळे या मुलांना दुस-या वर्गात बसवावे लागत आहे. त्यामुळे दोन्ही वगार्चे अध्ययनाचे काम थांबवावे लागत आहे. या शाळेच्या चार खोल्या धोकादायक असून दोन खोल्यांची तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे. १९६० सालाच्या तीन खोल्या असून या इमारतींची पडझड झाली असली तरी या इमारती मध्येच वर्ग भरत आहे. तीन इमारती पैकी दोन इमारतींच्या स्लॅबला पाझर सुटला असून तो झुकला असून अनेक ठिकाणी तडे गेले आहे. या गावच्या शाळेत १८० विद्यार्थी असून सातवीपर्यंत वर्ग असून नवीन सहा खोल्याची तातडीने आवश्यकता आहे.