विद्यार्थ्यांनी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हावे : कविता नावंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:57 PM2019-07-07T12:57:43+5:302019-07-07T12:58:29+5:30

जीवनामध्ये प्रत्येकाला अपयश आणि आव्हानांना सामोरे जावे लागते.

Students should be able to meet the challenges: Kavita Natande | विद्यार्थ्यांनी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हावे : कविता नावंदे

विद्यार्थ्यांनी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हावे : कविता नावंदे

अहमदनगर : जीवनामध्ये प्रत्येकाला अपयश आणि आव्हानांना सामोरे जावे लागते. मनाने सक्षम असणारेच आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. खेळामुळे यश-अपयश पचविण्याची क्षमता निर्माण होऊन मन सक्षम होते. शालेय जीवनात अभ्यासाएवढेच महत्व खेळालाही द्या, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांनी सांगितले़
टाकळी खातगाव (ता.नगर) येथील हनुमान विद्यालयात ‘क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे बोलत होत्या. माजी सरपंच लक्ष्मण नरवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील गंधे, नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष गिताराम नरवडे, अल्लाबक्ष शेख, केंद्रप्रमुख बबन कुलट, माजी प्राचार्य भाऊसाहेब सातपुते, उपप्राचार्य संजय दुधाडे, रमेश भनगडे उपस्थित होते.
नावंदे म्हणाल्या, पालकांनी मुलांना भवितव्याबाबत फक्त जाणीव करून देण्याची गरज आहे. पालकांनी मुलांवर मोठ्या प्रमाणात अपेक्षांचे ओझे टाकल्यास विद्यार्थ्यांचे खेळाकडे दुर्लक्ष होते़ विद्यार्थी सर्वांगिण विकासाऐवजी खुजे होत आहेत. अपयश, पराभव, मनाविरुद्धच्या घडणाऱ्या घटनांना मनाने सक्षम असणारी व्यक्तीच सामोरे जाऊ शकते. खेळामुळे यश-अपयश पचविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असते. त्यासाठी प्रत्येकाने अभ्यासाएवढे खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे सांगत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींविषयी खेळाडूंना सविस्तर माहिती सांगितली़
प्राचार्य साहेबराव कुलट यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक सुभाष नरवडे व सविता खंडाळे यांनी सूत्रसंचालन केले. गोरक्षनाथ बांदल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. केशव चेमटे यांनी आभार मानले.

Web Title: Students should be able to meet the challenges: Kavita Natande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.