विद्यार्थ्यांनी कृषी उद्योजक होऊन रोजगार निर्मिती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:20 AM2021-04-21T04:20:37+5:302021-04-21T04:20:37+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन कार्यक्रम ऑनलाईन नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन कार्यक्रम ऑनलाईन नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे अधिष्ठाता अशोक फरांदे बोलत होते.
याप्रसंगी पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता श्रीमंत रणपिसे, हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी मिलिंद अहिरे ऑनलाईन उपस्थित होते.
फरांदे म्हणाले, राष्ट्रीय पातळीच्या शिक्षणाची स्पर्धा करण्यासाठी पुढील वर्षापासून पाचव्या अधिष्ठाता समितीनुसार संपूर्ण देशात पदव्युत्तर महाविद्यालयाचा एकच अभ्यासक्रम असणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये डिजिटल माध्यमाद्वारे प्रभावी शिक्षण सुरु आहे. विद्यार्थ्यांनी नवीन संकल्पनेवर संशोधन करावे. या डिजिटल युगामध्ये काटेकोर शेती पद्धतीवर अधिकचे संशोधन करुन आपले नैसर्गिक स्त्रोत संवर्धन करावे.
प्रमोद रसाळ म्हणाले, कृषी विद्यापीठांमध्ये आणि कृषी महाविद्यालयांमध्ये संशोधनासाठी, शैक्षणिक उपक्रमांसाठी आणि विविध गुणदर्शनासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा आपल्या संशोधनासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुरेपूर वापर करावा. विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व आपले करिअर घडवावे. आपल्याला दिलेल्या अवधीत आपले पदव्युत्तर पदवी पूर्ण करावी.
दिलीप देवकर यांनी पदव्युत्तर महाविद्यालयाचा शैक्षणिक उपक्रम आणि नियमांचे सादरीकरण केले. विद्यापीठ ग्रंथपाल अतुल देशमुख यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाची माहिती करुन दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. बी. बी. ढाकरे यांनी तर आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी मानले.