विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे होऊन यशाचे स्वप्न पहावे : मिलिंद शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:20 PM2018-07-20T17:20:51+5:302018-07-20T17:20:59+5:30
नगरच्या विविध महाविद्यालयांमधून अनेक अभिनेते घडले. आज मी चित्रपटसृष्टीत यशस्वी होऊन अभिनेता म्हणून तुमच्या समोर उभे असल्याचा अभिमान वाटत आहे.
अहमदनगर : नगरच्या विविध महाविद्यालयांमधून अनेक अभिनेते घडले. आज मी चित्रपटसृष्टीत यशस्वी होऊन अभिनेता म्हणून तुमच्या समोर उभे असल्याचा अभिमान वाटत आहे. त्यावेळी सारडा महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व मित्रांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे ध्येय गाठू शकलो. ‘रे राया’ हा चित्रपट अशाच ध्येयवेड्या युवकाचा आहे. माझ्यासाठीही टाळ्या वाजल्या पाहिजे, असे जे स्वप्न पाहतात, तेच यशाच्या शिखरावर जातात. विद्यार्थ्यांनीही जीवनामध्ये कायम ध्येयवेडे होऊन यशाचे स्वप्न पहावे, असे मत नगरचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केले.
अभिनेते मिलिंद शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘रे राया’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन पेमराज सारडा महाविद्यालयात झाले. यावेळी दिग्दर्शक मिलिंद शिंदे बोलत होते.
भूषण प्रधान म्हणाले, आतापर्यंत बऱ्याच स्पोटर््स विषयावर चित्रपट झाले. मात्र रनिंग, हाय जंम्प व तिरंदाजी हे तीन खेळ एकाच चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मिलिंद शिंदे यांनी अत्यंत उत्कृष्टपणे हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नगरमध्ये फार सुंदर व चांगले लोकेशन आहेत. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुनील रामदासी म्हणाले, मिलिंद शिंदे पेमराज सारडा महाविद्यालयातून शिक्षण घेऊन चित्रपटसृष्टीत गेला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला या पहिल्याच चित्रपटाचे प्रमोशन सारडा महाविद्यालयात झाले.
चित्रपटातील प्रमुख नायक भूषण प्रधान, नायिका संस्कृती बालगुडे, निर्माते संजय पोपटानी आदी उपस्थित होते. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव सुनील रामदासी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अमरजा रेखी, उपप्राचार्य प्रा. ज्ञानदेव जाधव, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षक मंगला भोसले आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिलिंद शिंदे यांनी ‘रे राया’ या चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. यावेळी मिलिंद शिंदे व उपस्थित अभिनेत्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या.