पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश; शिक्षण विभाग सज्ज

By चंद्रकांत शेळके | Published: June 13, 2023 09:48 PM2023-06-13T21:48:24+5:302023-06-13T21:48:56+5:30

गुरूवारी वाजणार शाळांची घंटा

Students will get free textbooks, uniform on the first day; Education department ready | पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश; शिक्षण विभाग सज्ज

पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश; शिक्षण विभाग सज्ज

अहमदनगर : यंदा ५६ दिवसांच्या उन्हाळी सुटीनंतर गुरुवारी (दि. १५ जून) शाळा उघडणार असून जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, तसेच गणवेश वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.

राज्यभरात २१ एप्रिलपासून शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या होत्या. या सुट्या संपून आता १५ जूनपासून शाळांची घंटा वाजणार आहे. त्यादृष्टीने मुख्याध्यापक, शिक्षकांनी तयारी केली आहे. जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप दरवर्षी करण्यात येते.

यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ८७९ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पोहोचविण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे.

१ लाख ८५७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

जिल्ह्यातील १ लाख ८५७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, तसेच कटक मंडळाच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुले यांना शासनाकडून मोफत गणवेश दिला जातो. या गणवेशाचे पैसे शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले असून या समित्या गणवेश खरेदी करणार आहेत.

दुसरा गणवेश अधांतरीच

दरवर्षी शासनाकडूनच दोन गणवेशाचे पैसे देण्यात येतात. त्यातून स्थानिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समित्या कापड खरेदी करून गणवेश घेतात. मात्र यावर्षी एक राज्य एक गणवेश या धर्तीवर थेट राज्य शासनच दोन गणवेश पुरवणार, अशी घोषणा झाली. मात्र त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली नाही. शासनाने पूर्वीप्रमाणेच एका गणवेशाचे पैसे शाळांना दिले. मात्र दुसऱ्या गणवेशाचे काय? याचे उत्तर अजूनही शाळांना, तसेच पालकांना मिळालेले नाही.

या शाळांना मिळणार पुस्तके

शासकीय शाळा (समाजकल्याण, आदिवासी विकास, सेंट्रल स्कूल, नवोदय), स्थानिक स्वराज्य (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ), तसेच शासन अनुदानित, अंशत: अनुदानित अशा एकूण साडेचार हजारांहून अधिक शाळांमधील साडेचार लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.

महागाईने पालकांचे कंबरडे मोडले

जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांतील मुलांना पाठ्यपुस्तके, गणवेश मोफत मिळणार आहेत. मात्र खासगी शाळांतील मुलांच्या पालकांना शालेय साहित्य खरेदीसाठी मोठा खर्च येत आहे. यंदा शालेय साहित्याचे दर वाढल्याने प्रत्येक विद्यार्थ्यामागे पाठ्यपुस्तके, वह्या, तसेच गणवेशाचा खर्च दोन ते चार हजारांपर्यंत जात आहे.

Web Title: Students will get free textbooks, uniform on the first day; Education department ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.