उपजिल्हा रुग्णालयात राजीनामासत्र
By Admin | Published: September 6, 2014 11:45 PM2014-09-06T23:45:23+5:302023-06-26T14:57:05+5:30
कर्जत : गेल्या पाच वर्षांपासून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत़
कर्जत : गेल्या पाच वर्षांपासून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत़ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे होणारे दुर्लक्ष आणि प्रमुख पदावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र यामुळे रुग्णांवर उपचार करायचे कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे़ या उपजिल्हा रुग्णालयातील अखेरचे वैद्यकीय अधिकारी एऩ एस़ राठोड यांनीही राजीनामा दिला असून, शनिवारी (दि़६) त्यांना कार्यमुक्त करण्यात आले़
दहा वर्षापूर्वी कर्जत येथे दोन कोटी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालय उभारले. या भागातील रुग्णांना बाहेर जाण्याची वेळ येऊ नये म्हणून अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या़ मात्र, मंजूर पदे अद्याप न भरल्यामुळे अनेक सुविधा कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत़ कर्जत येथे या उपजिल्हा रुग्णालयात दररोज किमान चारशे रुग्ण उपचारासाठी येतात़ मात्र, येथे वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार कोणी करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे़
उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकाचे एक पद मंजूर आहे़ मात्र ते २००९ पासून रिक्त आहे. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची सात पदे मंजूर आहेत. यातील काहींनी राजीनामे दिले तर काहींचा नेमणुकीचा कार्यकाळ संपल्यामुळे सहा जागा रिक्त होत्या़ तर शनिवारी (दि़६) शेवटचे वैद्यकीय अधिकारी एन. एस. राठोड यांनी राजीनामा दिला असून, त्यांना सायंकाळी कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथे एकही वैद्यकीय अधिकारी नाही. येथील रिक्त पदाबाबत वरिष्ठ पातळीवरुन कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत़ विशेष म्हणजे अद्ययावत यंत्रणाही वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे वापराविना खराब झाली आहे़ याकडेही वरिष्ठ कानाडोळा करीत आहेत.
या रुग्णालयात पाण्याची व विजेची सोय नाही. ब्लड बँक बंद आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे समस्यांच्या गर्तेतून उपजिल्हा रुग्णालय बाहेर निघणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे़ या रुग्णालयातील वैद्यकीय अनास्थेची वस्तुस्थिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्यामुळे बाहेर आली. त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला. (तालुका प्रतिनिधी)