रस्त्यांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:24+5:302021-02-24T04:22:24+5:30
कोपरगाव शहरातील नागिरकांच्या सोयीसाठी कोपरगाव नगर परिषदेने १४ व्या वित्त आयोगातून सुमारे ८ कोटींच्यावर रकमेच्या २८ रस्त्यांच्या कामांची तांत्रिक ...
कोपरगाव शहरातील नागिरकांच्या सोयीसाठी कोपरगाव नगर परिषदेने १४ व्या वित्त आयोगातून सुमारे ८ कोटींच्यावर रकमेच्या २८ रस्त्यांच्या कामांची तांत्रिक मजुरी घेऊन निविदा काढली होती. यात शहरातील बरेच प्रमुख तर काही नवीन रस्ते होते. त्यामुळे या रस्त्यांची कामे झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल असे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले होते. स्थायी समितीच्या १२ जानेवारीच्या बैठकीत भाजपा व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी कामांना मंजुरी दिली नव्हती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने याचे चांगलेच भांडवल केले होते. भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी यांनी शहरभर पत्रके वाटून आपली भूमिका स्पष्ट केली होती.
त्यानंतर १ फेब्रुवारीला पुन्हा दुसरी बैठक झाली. या बैठकीत या सर्व कामांची रक्कम ही अवाच्यासव्वा रक्कम असल्याने फेर अंदाजपत्रक तयार करून, त्याची तांत्रिक मजुरी ही बांधकाम खात्याकडून घ्यावी. पुन्हा मंजुरीला ठेवा आम्ही मंजूर करू असे भाजपा व शिवसेनेच्या काही नगसेवकांनी सांगितले होते. नगराध्यक्ष यांनी हे काहीच न करता ही कामे पुन्हा १६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवली होती. त्यावर मागील बैठकीतील आपल्या भूमिकेवर ठाम राहून भाजपा व शिवसेनेच्या काही नगर सेवकांनी तिसऱ्यांदा या सर्व रस्त्यांची कामे नामंजूर केली. यावेळी मात्र, नगराध्यक्ष वहाडणे यांनी तुम्ही कामे मंजूर करा अथवा नका करू. मी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी आणून रस्त्यांची कामे करणारच असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्यानुसार या २८ रस्त्यांची कामे व सौर पॅनल बसविणे हे दोन ठराव मंजुरीसाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले आहे. त्यामुळे यावर एका महिन्यात निर्णय होणे अपेक्षित आहे.
.........
सर्वसाधारण सभा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी कायद्याच्या तरतुदीनुसार २८ रस्त्याच्या कामांचा व सौर पॅनल बसविण्याच्या प्रस्तावाला मजुरी मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
- विजय वहाडणे, नगराध्यक्ष, नगर परिषद, कोपरगाव