कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:01+5:302021-04-11T04:20:01+5:30
कोपरगाव : कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण होत असल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे, त्या करिता या कांदा उत्पादक ...
कोपरगाव : कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण होत असल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे, त्या करिता या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रतिक्विंटल ४०० रूपये प्रमाणे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
कोल्हे म्हणाल्या, गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी बांधवांना दुबार बियाणे घेऊन कांदा लागवड करावी लागली. त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. सध्या कांदा पिकाच्या काढणीचे काम सुरू असून कांदा हे नाशवंत पीक असल्याने जास्त दिवस ठेवू शकत नाही. तसेच सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने निर्बंध लावण्यात आले आहे. कांदा पिकाचे दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी बांधवांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील सरकारच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये अनुदान देण्यात आले होते.