छप्परात राहाणा-या निताने मिळवले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:35 PM2018-06-16T15:35:33+5:302018-06-16T15:49:00+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थीनी निता जठार हिने परिस्थितीवर मात करत दहावीत यश मिळविले.
नानासाहेब जठार
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थीनी निता जठार हिने परिस्थितीवर मात करत दहावीत यश मिळविले. मोलमजुरी करुन छप्परात राहाणा-यांची मुलगी निता पोपट जठार वेळ मिळेल, तेव्हा अभ्यास करून दहावीत ९० टक्के गुण मिळवून कष्टमय असे यश प्राप्त केले आहे.
निताच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. आई व वडील दोघेही मोलमजुरी करुन कुटुंबाची उपजीविका करतात. पती-पत्त्नी, एक मुलगा व नितासह दोन मुली असा हा पोपट जठार यांचा परीवार, पण त्यांना राहायला व्यवस्थित घर नाही. दगड मातीच्या भिंती व गवताचे छत. मागील वर्षी त्यांच्या घराचे छत वादळात उडून गेले होते. अशाही परिस्थितीत तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले. आई अडाणी व वडील सहावी शिकलेले. ना घरात शैक्षणिक वातावरण, ना कोणतेही खाजगी क्लास लावण्याची ऐपत, ना पुरेशे शालेय साहीत्य उपलब्ध. केवळ शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शनाखाली तिने अभ्यास केला. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत निताने मिळवलेले या यशामुळे भाऊ प्रशांत याने कष्टकरुन तिला पुढील शिक्षणाला साथ देण्याचे ठरवले आहे. प्रशांत दहावी शिकून मिळेल तो कामधंदा करत आहे. शासनाचे अटीत बसत नसल्याने मजुरी करून जिवन जगणा-या व छप्परात रहाणा-या या कुटुंबाला अद्याप घर मिळाले नाही. अशाही परिस्थिती निताला शिक्षणाची आस आहे. शिकून मोठं होण्याची आकांक्षा तिने बाळगली आहे.