शिर्डीत विमानाची चाचणी यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 08:48 PM2017-09-26T20:48:37+5:302017-09-26T20:51:09+5:30
जगभरातून येणा-या साईभक्तांसाठी महत्त्वाच्या ठरणा-या शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे येत्या १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे भक्तार्पण व दुस-या दिवसापासून विमानसेवा सुरू होईल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे़
शिर्डी : जगभरातून येणा-या साईभक्तांसाठी महत्त्वाच्या ठरणा-या शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे येत्या १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे भक्तार्पण व दुस-या दिवसापासून विमानसेवा सुरू होईल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे़.
एअर इंडियाचे बहात्तर आसनी विमान मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावरून दुपारी सव्वाचार वाजता शिर्डीच्या दिशेने झेपावले. हे विमान केवळ पस्तीस मिनिटात शिर्डी विमानतळावर पोहचले. नंतर घिरट्या घालून ५ वाजून २ मिनिटांनी या विमानाची चाके शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीवर स्थिरावली. या विमान प्रवासाचा पहिला प्रवासी होण्याचा मान अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना मिळाला. त्यांच्याबरोबर केंद्रीय विमान उड्डयन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर गुप्ता, विभागीय संचालक मुकेश भाटिया यांच्यासह चौदा जणांचा समावेश होता. राकेश शेट्टी व संदीप मेहरा या विमानाचे वैमानिक होते. सहा वाजता अधिकाºयांसह हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने झेपावले़
विमानतळावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष ममता पिपाडा, माजी विश्वस्त सचिन तांबे, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, शिर्डी विमानतळाचे संचालक धिरेन भोसले आदींसह सरकारी अधिकाºयांची उपस्थिती होती.
..................................................
ट्रायल लँडिंगचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, हा मोठा योग आहे़ सुरूवातीला मुंबईहून चार, दिल्लीहून व हैदराबाद येथून प्रत्येकी एक अशा सहा विमानांच्या फेºया सुरू होतील़ धावपट्टीच्या विस्तारानंतर काही महिन्यात आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होईल.
-राम शिंदे, पालकमंत्री, अहमदनगर.
..............................................
अनेक जागा बदलत व अडथळ्यांची शर्यत पार करीत हे विमानतळ पूर्णत्वास गेले़ तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी याचे भूमिपूजन केले व संस्थानने पन्नास कोटींची मदत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी सकारात्मक भूमिका बजावली. काकडीवासीयांनीही मोठे योगदान दिले. आपल्यादृष्टीने हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे.
-राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते व विधानसभा सदस्य, शिर्डी.