दोनशेहून अधिक महिलांचे लसीकरण यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:41+5:302021-08-22T04:24:41+5:30
माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या पुढाकाराने जनसेवा फौंडेशनने शिर्डी ...
माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या पुढाकाराने जनसेवा फौंडेशनने शिर्डी मतदारसंघातील रुई, शिंगवे, सावळीविहीर खुर्द आणि बुद्रुक या गावांमध्ये जाऊन लसीकरणाबाबत महिलांमध्ये प्रबोधन केले आणि लस घेण्याबाबतची त्यांच्यामध्ये मानसिकताही निर्माण केली. शनिवारी सावळीविहीर बुद्रुक येथील आरोग्य केंद्रावर या महिलांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी जनसेवा फौंडेशनने विशेष पुढाकार घेतला. महिलांमध्ये लसीकरणाबाबत झालेल्या प्रबोधनाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. रुई, शिंगवे, सावळीविहीर खुर्द, बुद्रुक या गावांतील महिला उत्स्फूर्त लसीकरणासाठी आल्याचे पाहायला मिळाले. दिवसभरात दोनशेहून अधिक महिलांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. राहाता तालुक्यात १ लाख १६ हजार ३०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. रक्षाबंधानाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे लसीकरण करून घेण्यासाठी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अन्य गावांमध्येही अशाच प्रकारे महिलांमध्ये प्रबोधन करून लसीकरण करून घेण्याबाबत जनसेवा फौंडेशन प्रयत्न करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.