कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...

By सुदाम देशमुख | Published: October 14, 2024 08:23 PM2024-10-14T20:23:01+5:302024-10-14T20:23:58+5:30

२०२६ मध्ये बसणार गादीवर : एकनाथवाडीच्या ग्रामस्थांनी रथातून आणले गडावर.

successor of Bhagwangad Krishna Maharaj Shastri When will sit on the throne | कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...

कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...

लोकमत न्यूज नेटवर्क, खरवंडी कासार (जि. अहिल्यानगर) : संत भगवानबाबांची समाधी असलेल्या भगवानगडाचे उत्तराधिकारी म्हणून एकनाथवाडी (ता. पाथर्डी) येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत कृष्णा महाराज शास्त्री यांची महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी निवड केली आहे. येथील संत ज्ञानेश्वर मंदिर २०२६ मध्ये पूर्ण होणार असून, त्याचवर्षी गडाचा अमृतमहोत्सवही आहे. त्यामुळे याच कार्यक्रमात कृष्णा महाराज शास्त्री यांच्याकडे गादीचे हस्तांतर होणार आहे. भगवानगडाचे ते चौथे महंत असतील.

सोमवारी (दि.१४) एकनाथवाडी येथून ग्रामस्थांनी सकाळी ८ वाजता कृष्णा महाराज शास्त्री यांना रथामध्ये बसवून ढोल, ताशा, टाळ, मृदंगाच्या निनादात हरिनामाचा जयघोष करत भगवानगडावर पोहोचविले. एकनाथवाडीपासून निघाल्यानंतर रस्त्यामधील मुंगसवाडे, श्रीपतवाडी, मालेवाडी, खरवंडी कासार, कीर्तनवाडी गावांमध्ये कृष्णा महाराज शास्त्री यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. ठिकठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षावही केला. सायंकाळी ५ वाजता कृष्णा महाराज भगवानगड वर पोहोचल्यानंतर गडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी महाराज यांनी एकनाथवाडी ग्रामस्थांचे भगवान बाबांची प्रतिमा देऊन स्वागत केले.

२०२६ मध्ये भगवानगडाचा अमृतमहोत्सव आहे. त्याचवर्षी संत ज्ञानेश्वर यांच्या मंदिराचे कामही पूर्ण होणार आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीचे हस्तांतर करण्यात येईल, असे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले. कृष्णा महाराज शास्त्री हे भगवानगडाचा विकास करतील, असा पूर्ण विश्वास आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. भविष्यामध्ये अशाच माणसाची गरज भगवानगडाला आहे. अशा पद्धतीचा शब्दही त्यांनी दिला आहे, असेही डॉ. नामदेव शास्त्री यांनी सांगितले.

ज्ञानेश्वरीचा अभ्यास...

कृष्णा महाराज शास्त्री यांचे मूळ गाव तेलंगणा राज्यात आहे. त्यांनी बारा वर्षांपूर्वी भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात ज्ञानेश्वरीचे शिक्षण घेतले. त्यांनी एमएही केले आहे. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी त्यांना डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे मागदर्शन लाभले. तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानचे ते महंत झाले.

 

Web Title: successor of Bhagwangad Krishna Maharaj Shastri When will sit on the throne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.