"अशी शाळा आजवर पाहिली नाही"; शिक्षण आयुक्तांकडून ZP शाळेचं तोंडभरून कौतूक
By चंद्रकांत शेळके | Published: September 6, 2023 08:39 PM2023-09-06T20:39:50+5:302023-09-06T20:41:21+5:30
बुधवारी (दि. ६) आयुक्त मांढरे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचा आढावा घेतला.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी बुधवारी नगर दौऱ्यावर असताना पारनेर तालुक्यातील पानोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेतील फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूम, गुणवत्तापूर्ण शिक्षण, तसेच भौतिक सुविधा पाहून ‘अशी शाळा आपण आजवर पाहिलीच नाही’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नंतर त्यांनी पारनेर पंचायत समिती, तसेच जिल्हा परिषदेचा प्राथमिक व माध्यमिक विभागाचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.
बुधवारी (दि. ६) आयुक्त मांढरे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचा आढावा घेतला. बुधवारी ते पुण्याहून नगरला येत असताना त्यांनी प्रथम राळेगणसिद्धी येथे भेट दिली. त्यानंतर वाटेतच असलेल्या पानोली येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळेला त्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांना तेथे दिले जात असलेले डिजिटल शिक्षण, शाळेतील भौतिक सुविधा, तसेच स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी शाळेतील शिक्षकांचे कौतूक केले. इतर जिल्हा परिषदांच्या शाळाही अशाच पद्धतीने विकसित व्हाव्यात, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर पारनेर पंचायत समितीचा आढावा घेतला. तेथे शिक्षण विभागाचे दप्तर तपासून आवश्यक त्या सूचना दिल्या.
दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास ते जिल्हा परिषद मुख्यालयात दाखल झाले. प्रथम प्राथमिक विभागात आल्यानंतर त्यांनी टेबलनिहाय भेट देत तपासणी सुरू केली. शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले ज्या टेबलवरून मंजूर होतात, तो टेबल त्यांनी तपासला. कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी आहेत का? वेळेवर वैद्यकीय बिले मंजुरीसाठी जातात का? अशी विचारणा त्यांनी केली. आणखी एक-दोन टेबलची दफ्तर तपासणी करून ते माध्यमिक विभागाकडे रवाना झाले.
माध्यमिक विभागात प्रामुख्याने वेतन पथकात त्यांनी पाहणी करून काही सूचना दिल्या. मागील काही काळापासून शिक्षकांच्या वेतनासंबंधी काही तक्रारी होत्या. त्याबद्दल त्यांनी वेतन अधीक्षकांना कडक सूचना दिल्या. त्यानंतर माध्यमिक विभागात काही टेबलची तपासणी केली. दरम्यान, सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन ते पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान, आयुक्तांच्या आढावा बैठकीमुळे सकाळी लवकर आलेले दोन्ही शिक्षण विभागातील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत मुख्यालयात थांबून होते.
आयुक्तांना भावला फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूम
पानोली येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी शाळेत मागील वर्षी फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आला आहे. ३० विद्यार्थी क्षमतेच्या या डिजिटल क्लासरुममध्ये ‘ट्रान्सफॉर्मेशन ऑफ टेक्नोलॉजी इनटू एज्युकेशन’ या संकल्पनेवर आधारित अभ्यासक्रम मुलांना शिकवला जातो. मुलांच्या प्रत्येक बेंचवर टचस्क्रीन माॅनिटर असून त्यावरच मुले वर्गपाठ, गृहपाठ करतात. केलेला वर्गपाठ सेव्ह करता येतो. शिवाय त्यालाच इंटरनेटची सुविधा असल्याने दृकश्राव्य डिजीटल शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळत असल्याचे पाहून आयुक्तांनी या शाळेचे कौतूक केले.