भीमाशंकरला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग; काही मिनिटात जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 09:48 AM2022-05-28T09:48:14+5:302022-05-28T09:48:40+5:30
आग लागल्याचे समजताच प्रवाशी सुखरूप बाहेर आल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर (जि. अहमदनगर) : नाशिक - पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळुन खाक झाले. सुदैवाने दहा प्रवाशी वेळीच वाहनातुन बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले. शनिवारी (दि. २८ मे) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
शनिवारी सकाळच्या सुमारास शिर्डीहून नाशिक - पुणे महामार्गाने भीमाशंकर येथे प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलर (एम. एच. १२ एच. ०४३४) मधून चालक विजय काकडे (रा. शिर्डी , अहमदनगर) हा दहा प्रवाशांना घेवुन पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी जात होता. टेम्पो ट्रॅव्हलर महामार्गावरील चंदनापुरी घाटात सकाळी सात वाजेच्या सुमारास आला असता वाहनाला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच प्रवाशी सुखरूप बाहेर आल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. घटना घडताच महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार नारायण ढोकरे, पंढरीनाथ पुजारी व टोल प्लाझाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली.
संगमनेर नगर पालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, टेम्पो ट्रॅव्हलर पुर्णपणे जळुन खाक झाला. वाहतूक सुरळीत करण्यात आली.