महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यकर्त्यांना सुधा मूर्तींचा सल्ला; म्हणाल्या, 'आपण सगळे भारतीय, छोटे मुद्दे सोडून द्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:26 PM2022-12-27T13:26:58+5:302022-12-27T13:27:33+5:30
"यशोदा व देवकी दोघीही कृष्णाच्या आईच होत्या, कृष्ण मात्र एकच होता. आई दोन असू द्या, पण आपण एकच भारतीय आहोत. घरात दोन भावंडं असतात, दोघे मिळून राहिले तर आनंद मिळतो."
शिर्डीः उदात्त विचार ठेवून काम करू या. छोटे-छोटे मुद्दे सोडून द्या. देशात गरिबी कमी करायची आहे. मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवायचे आहे. स्वच्छतागृहे बांधायची आहेत. अशी कामे करायची सोडून लहान- लहान गोष्टीत आपली शक्ती वाया घालवू नका, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी महाराष्ट्र व कर्नाटकच्या राज्यकर्त्यांचे वडिलकीच्या नात्याने कान टोचले.
सुधा मूर्ती यांनी सोमवारी कुटुंबासह साईदरबारी हजेरी लावली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांनीही संस्थानला पुस्तके भेट दिली. संस्थानच्या प्रसादालयात भोजन घेऊन त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा राजकीय मुद्दा म्हणून कधी विचारही करत नाही. कोणत्या राज्यात कोण मंत्री आहे हेही माहिती नसते. गरीब लोकांसाठी काम करावे एवढेच आपल्याला वाटते, असे मतही सुधा मूर्ती यांनी व्यक्त केले.
मूर्ती म्हणाल्या, यशोदा व देवकी दोघीही कृष्णाच्या आईच होत्या, कृष्ण मात्र एकच होता. आई दोन असू द्या, पण आपण एकच भारतीय आहोत. घरात दोन भावंडं असतात, दोघे मिळून राहिले तर आनंद मिळतो. भाषेवरून वाद योग्य नाही मी मराठी व कानडी दोन्ही भाषा बोलते व दोन्ही राज्यांची लेक आहे. सीमेवरील लोकांना आईचे व मावशीचे असे दोघांचेही प्रेम मिळावे.
जावई इंग्लंडचा पंतप्रधान झाल्याचा आनंद वाटतो. त्यापेक्षा अधिक काही नाही. त्यांना त्यांच्या देशासाठी भरपूर काम आहे तसे आम्हाला आमच्या देशासाठी आहे. ते पंतप्रधान झाल्यानंतर गेले नाही, शुभेच्छा दिल्या. त्यांना अगोदर काम करू द्या. २०२३ मध्ये कधीतरी भेटायला जाऊ, असे मूर्ती यांनी सांगितले.
विश्वस्त व्हायला आवडेल
साईबाबांची इच्छा असेल तर साईसंस्थानचे विश्वस्त व्हायला मनापासून आवडेल. नवीन संकल्पना राबवता येतील. यापूर्वी तिरुपती देवस्थानला नऊ वर्षे तर वैष्णोदेवीला तीन वर्षे विश्वस्त म्हणून काम केले आहे. नातेवाईक व घरच्यांना स्पेशल दर्शन घडविण्यासाठी पदाचा उपयोग करणार नाही, असेही मूर्ती यांनी स्पष्ट केले. संस्थानचे जेवण अप्रतिम होते. आज आईच्या हातची भाकरी व पिठलं खाल्ल्यासारखे वाटले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.