उसाची पळवापळवी; प्रवरा व संगमनेरला ऊस न देण्याचे भानुदास मुरकुटेंचे आवाहन
By शिवाजी पवार | Published: January 29, 2024 02:26 PM2024-01-29T14:26:16+5:302024-01-29T14:27:24+5:30
कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शेतकरी व सभासदांना श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु वाचविण्याची मागणी केली आहे.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांना उसाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे येथील अशोक साखर कारखान्याच्या कार्यक्षत्रातील उसाची संगमनेर आणि प्रवरा साखर कारखान्यांनी तोडणी सुरू केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शेतकरी व सभासदांना श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु वाचविण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुरकुटे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे. श्रीरामपूर तालुक्याचे हक्काचे पाणी पळविणाऱ्या आणि या भागाचे वाळवंट करण्यासाठी टपलेल्या या नेत्यांच्या कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये.
महसूलमंत्री विखे पाटील व माजी मंत्री थोरात यांचे श्रीरामपूर तालुक्याच्या ऊस उपलब्धता वाढीसाठी कोणतेही योगदान नाही. त्यामुळे ‘अशोक’च्या सभासद शेतकऱ्यांनी प्रवरा व संगमनेर कारखान्यास ऊस न देता आपल्या भागाची कामधेनु असणाऱ्या अशोक कारखान्यासच ऊस पुरवावा, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे.
मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विखे व थोरातांनी आपल्या भागाचे पाणी पळविले. मी आमदार असताना विखेंनी प्रवरा परिसरात डाव्या कालव्यावर आडवे बांध घातले होते. ते मी सुरुंग लावून उद्ध्वस्त केले. प्रवरा डावा कालव्याचे नूतनीकरण करून वहन क्षमतेत दीडपट वाढ केली. हजारो एकराचे रद्द झालेल्या ब्लॉकचे फेरवाटप करून आपल्या भागाचे पाटपाणी संरक्षित केले.
अशोक कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रतील ओढ्या-नाल्यांवर बंधाऱ्यांची मालिका उभारून पाणी उपलब्धता वाढविली. या सर्वांमुळे कार्यक्षेत्रातील उसाच्या उपलब्धतेत ३६ हजार टनवरून बारा लाख टनपर्यंत वाढ झाली. या उसावर प्रवरा व संगमनेर कारखान्याचा डोळा आहे. दोघेही नेते सत्तेच्या जोरावर आपल्या भागावर सतत अन्याय करतात, असा आरोप मुरकुटे यांनी केला.