नगरमधील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:11 PM2017-12-09T17:11:56+5:302017-12-09T17:12:50+5:30
नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने उसाला केवळ २२०० ते २३०० रूपये भाव देतात. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.
संगमनेर : भ्रष्ट सरकार साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने शेतक-यांना ऊस दरासाठी रस्त्यावर यावं लागतं आहे. नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने उसाला केवळ २२०० ते २३०० रूपये भाव देतात. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.
स्वातंत्र्यसैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीदिनी आयोजित कार्यक्रमासाठी खासदार शेट्टी संगमनेरात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकार व सहकारी साखर कारखानदारांवर टीका केली. खासदार शेट्टी म्हणाले, नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना माज चढला आहे. शेतक-यांनी हाती उसाचा बोडखा घेतल्याशिवाय हा माज उतरणार नाही. चळवळीत राज्यात अग्रेसर असणारा नगर जिल्हा मागे पडल्याने येथे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अच्छे दिनाचे गाजर दाखवून सर्वांना फसवले आहे. उस वगळता कोणत्याही शेतमालाला हमी भाव नाही. दुस-या देशातून शेतमाल आयात करायचा, निर्यातीच्या बाबतीतही अडथळे निर्माण करायचे. शत्रू राष्ट्र असलेल्या पाकि स्तानातून कांदा आयात करायचा असे करत सरकार शेतक-यांची जिरावायचा प्रयत्न करते आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली. कर्जमाफीची जबाबदारी सोपविलेल्यांना कर्जाच्या पध्दतीची माहिती नसल्याने शेतक-यांच्या कर्जमाफीचा खेळ खंडोबा झाला. लोकसभेत देशातून ५४३ खासदार निवडुून जातात. मात्र, देशात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महेत्यबद्दल कुणीही संसदेत प्रश्न मांडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.