उसाला पर्याय.. केशर आंबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:53 AM2018-06-29T10:53:24+5:302018-06-29T10:53:37+5:30
काळ्या रानात उसाचे पीक घेताना मुरमाड जमिनीवर काय पीक घ्यावे? याचा विचार कुक्कडवेढे (ता. राहुरी) येथील शेतकरी राजेंद्र गव्हाणे हे करीत होते.
भाऊसाहेब येवले
काळ्या रानात उसाचे पीक घेताना मुरमाड जमिनीवर काय पीक घ्यावे? याचा विचार कुक्कडवेढे (ता. राहुरी) येथील शेतकरी राजेंद्र गव्हाणे हे करीत होते. मुरमाड जमिनीत आंबा पीक केल्यास फायदेशीर शेती करता येईल, याचा अभ्यास गव्हाणे यांनी केला. तीन एकर मुरमाड जमिनीवर दहा वर्षांपूर्वी केशर आंब्याची लागवड केली. साडेतीनशे आंब्याची झाडे ऊसपिकाला भारी असल्याचा अनुभव गव्हाणे यांना आला आहे.
आंब्याची रोपे १६ बाय १६ फूट या अंतरावर लावली. सुरूवातीला राजेंद्र गव्हाणे यांनी तीन वर्षे आंतरपिके घेतली. आंबा पिकावर कमी खर्च करण्याचे धोरण आखले. त्यानुसार गावरान गायीचे गोमूत्र, शेण, डाळीचे पीठ, वडाखालची माती, गूळ यांचे मिश्रण पाण्यामध्ये एकत्र करून स्लरी तयार केली. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आंब्याच्या झाडांना स्लरी देण्यात आली. रसायनिक खते व औषध फवारणीचा खर्च टाळला. त्यामुळे सेंद्रिय आंबे ग्राहकांच्या पसंतीला उतरले. तिसऱ्या वर्षांपासून आंब्याचे फळ धरण्यास सुरूवात केली.
शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने आंब्याची विक्री केली जाते. झाडावरून कै-या उतरल्यानंतर त्या नैसर्गिक पद्धतीने पिकविल्या जातात. त्यानंतर तयार झालेल्या आंब्याची प्रतवारी केली जाते. पिक्यापेक्षा विक्या भारी... या न्यायाने राजेंद्र गव्हाणे हे थेट ग्राहकांना आंब्याची हातविक्री करतात. वळण, मानोरी, कुक्कडवेढे, सोनई, राहुरी, ब्राह्मणी आदी ठिकाणी स्टॉल उभारून आंब्याची विक्री केली जाते. त्यामुळे आंब्याच्या झाडापासून अधिक प्रमाणावर उत्पन्न मिळण्यास मदत होते. कुटुंबातील सदस्य वडील भिकाजी गव्हाणे, मुलगा नीलेश, महेश यांची मदत आंबे विक्रीसाठी होते. ग्राहकांना माहीत असल्याने घरी येऊनही ग्राहक आंब्याची खरेदी केली जाते. ६० रुपये किलो या दराने आंब्याची विक्री केली जाते. एका झाडाला २० ते ३० किलो आंबे निघतात. उत्कृ ष्ट प्रतीचे रसायनरहित आंबे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.
आंबा पिकाशिवाय राजेंद्र गव्हाणे यांनी टिश्यूकल्चर जी-९ या वाणाची एक एकरावर ६ बाय ५ या अंतरावर लागवड केली आहे. एका एकरात १५०० केळीच्या रोपांची लागवड केली आहे. केळीमध्ये आंतरपीक तूर पीक घेतले आहे. केळी घडाने लगडली आहेत. केळीला ब-यापैकी भाव मिळणार असल्याने उसापेक्षा केळीतून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. डाळिंबाचे चार एकरात १२ बाय १० या अंतरावर भगवा वाणाची लागवड केली आहे. डाळिंबाला बहर आला असून, यंदा चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. या शिवाय यांनी गोपालन व्यवसाय केला आहे. जनावरांचे खत शेतीचे उत्पादन वाढविण्यास मदत करीत आहेत. फळबाग लागवड क रताना राजेंद्र गव्हाणे यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे.