अहमदनगर जिल्ह्यात हुमणीने कुरतडला ३६ हजार हेक्टरवरील ऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:09 AM2018-09-21T11:09:30+5:302018-09-21T11:09:35+5:30
पावसाअभावी आधीच खुंटलेली वाढ, हलकी जमीन आणि पावसाने दिलेली ओढ, यामुळे उसाच्या मुळाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
अण्णा नवथर
अहमदनगर : पावसाअभावी आधीच खुंटलेली वाढ, हलकी जमीन आणि पावसाने दिलेली ओढ, यामुळे उसाच्या मुळाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार हेक्टरक्षेत्रावरील उसाने मान टाकली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला आहे़ शासन त्यावर काय करते, याकडे ऊस उत्पादक शेतक-यांचे लक्ष लागले आहे.
ऊसाचा गळीप हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पावसाने ओढ दिल्याने उसाच्या पिकाची अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झाली. त्यापैकी ३३ हजार ७४० हेक्टर क्षेत्रावरील ऊस हुमणीने कुरतडल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना नुकताच सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने तो पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविला आहे. हुमणी अळी प्रशासकीय यंत्रणेला नवीन असेल, पण शेतक-यांसाठी ती नवीन नाही़ यापूर्वीही हुमणी अळीने ऊसाचे फड फस्त केल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडलेल्या आहेत. परंतु, शेतक-यांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. सरकारकडूनही त्याची दखल घेतली गेली नाही. शेतक-यांना हा भुर्दंड सोसावा लागतो़ यावर्षी ओरड झाल्याने प्रशसकिय यंत्रणेने मनावर घेतले. पण, सरकार त्याची दखल घेणार का हा खरा प्रश्न आहे.
कमी पाऊस पडल्यास हुमणीचा उसावर प्रादुर्भाव होतो. यंदा पावसाचे ६० दिवस कोरडे गेले़ याची कल्पना जिल्ह्यातील सर्व कृषी यंत्रणांना होती. या यंत्रणांनी काय उपाययोजना केल्या ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. हुमणीने मुळ्या कुरतडल्याने जिल्ह्यातील निम्मा ऊस उन्मळून पडला आहे. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळपावर होईल. नुकसानीचे प्रमाण वाढल्यानंतर सर्व कृषी यंत्रणा बांधाकडे धावल्या़ परंतु, ही अळी जमिनीत वाढत असल्याने तिचा बंदोबस्त करणे, म्हणावे तेवढे सोपे नाही. कारण ही अळी जमिनतच जन्माला येते आणि मुळ्या खाऊन मोठी होते. त्यामुळे जमिनीत पाय पसरल्यानंतर तिला रोखणे सर्वांच्याच अवाक्याबाहेरचे आहे.
कृषी विभाग, विद्यापीठ, विज्ञान केंद्रांची यंत्रणा गाफील
जिल्ह्यात कृषी विभाग, राहुरी कृषी विद्यापीठ आणि जोडीला दोन विज्ञान केंद्र जिल्ह्यात आहेत. असे असताना जिल्ह्यातील शेतक-यांवर नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ ओढावली असून, वेळ निघून गेल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. परंतु, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने नुकसान टाळणे अशक्य आहे.
प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामे करण्यास नकार
जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, कोरपरगाव, राहुरी, राहाता, श्रीगोंदा तालुक्यांमधील हुमणीने कुरतडलेल्या उसाचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांकडून ग्रामसेवक, तलाठी तहसीलदार यांच्याकडे होत आहे. परंतु, सरकारचा आदेश नसल्याचे कारण पुढे करत पंचनामे करण्यास ते नकार देत आहेत. जिल्ह्यातील शेतक-यांनी ‘लोकमत’ कार्यालयाशी संपर्क साधून ही माहिती दिली.
कृषी यंत्रणांचे वराती मागून घोडे
हुमणी कीड व्यवस्थापनाच्या कार्यशाळा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुरू आहेत. कार्यशाळा घेण्याची जणू काही स्पर्धाच तालुका कृषी यंत्रणामध्ये लागली आहे. मात्र त्यातून आता काही साध्य होईल, असे वाटत नाही. कारण हुमणी अळीचे उसाच्या मुळावर खाऊन टाकल्या आहेत. अळी येणार नाही, याची काळजी कृषी विभाग, कारखाने, विद्यपीठ आणि विज्ञान केंद्रांकडून घेणे अपेक्षित होते़. पण, तसे झाले नाही. अळी आल्यानंतर कृषी यंत्रणा कार्यशाळेचे घोडे दामटत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.