परवान्याविना ऊस गाळप सुरू : केदारेश्वर, तनपुरेसह ५ कारखाने
By मिलिंदकुमार साळवे | Published: November 17, 2018 10:36 AM2018-11-17T10:36:21+5:302018-11-17T10:37:23+5:30
राज्यातील साखर कारखानदारीचा यंदाचा हंगाम सुरू झाला असला तरी साखर आयुक्त कार्यालयाकडे कारखान्यांचे गाळप परवाने रखडले आहेत.
मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : राज्यातील साखर कारखानदारीचा यंदाचा हंगाम सुरू झाला असला तरी साखर आयुक्त कार्यालयाकडे कारखान्यांचे गाळप परवाने रखडले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी आयुक्त कार्यालयाकडून परवाना मिळण्याची वाट न पाहताच परवान्याविना आपला ऊस गळीत हंगाम सुरू केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात खासगी व सहकारी असे एकूण २२ साखर कारखाने आहेत. यावर्षी राज्यात जास्त ऊस असल्यामुळे एक महिनाअगोदरच कारखाने सुरू करण्याचा निर्णय साखर आयुक्तालयाने घेतला होता. त्यानुसार दसऱ्यापूर्वीच कारखान्यांचा बॉयलर पेटला. तर दिवाळीच्या सुमारास कारखान्यांच्या प्रत्यक्ष ऊस गाळपास सुरूवात झाली. हंगाम सुरू करण्यासाठी आयुक्तालयाने कारखान्यांना गाळप परवाने मिळविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन प्रस्ताव मागविले होते. त्याप्रमाणे कारखान्यांनी आयुक्तालयाकडे प्रस्ताव सादर केले. त्यानुसार गाळप परवाना मिळालेल्या कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन ऊस गाळप सुरू होऊन साखर उत्पादनास देखील सुरूवात झाली आहे. मात्र काही कारखान्यांनी साखर आयुक्तालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवित नियमांचे उल्लंघन करीत बिनदिक्कतपणे ऊस गाळप सुरू केले आहे.
राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्यास साखर आयुक्तालयाकडून परवाना मिळालेला नाही. पण या कारखान्याने ऊस गाळप करून साखर निर्मितीही सुरू केली आहे. उत्पादित केलेल्या साखर पोत्यांचे पूजनदेखील करण्यात आले आहे.
गाळप परवाना न मिळालेले कारखाने
साखर आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील युटेक, श्रीराम, साईकृपा-२(हिरडगाव) या ३ खासगी कारखान्यांसह तनपुरे, केदारेश्वर व नागवडे या ३ सहकारी साखर कारखान्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत गाळप परवाना मिळालेला नव्हता. यातील जय श्रीराम, तनपुरे, केदारेश्वर व नागवडे या चार कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यातील तनपुरे व केदारेश्वर कारखान्याकडे शेतकºयांची एफ. आर. पी. ची रक्कम थकलेली आहे.
गाळप परवाना मिळविण्यासाठी या कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. परवाना प्राप्त नसताना गाळप करणा-या कारखान्यांना असे गाळप सुरू केल्यापासून प्रति मेट्रिक टन १ हजार रूपये दंड करण्याची तरतूद आहे. - संगीता डोंगरे, साखर सहसंचालक, अहमदनगर.
कारखान्यास गाळप परवाना मिळालेला नाही. काही बाबींची पूर्तता करायची राहिली होती. पूर्तता होताच परवाना मिळेल. - टी. आर. ढोणे, कार्यकारी संचालक, तनपुरे सहकारी साखर कारखाना,राहुरी.