पेडगाव बसस्थानकावरच ऊस तोडणी मजूर महिलेची प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 01:29 PM2020-03-07T13:29:08+5:302020-03-07T13:29:52+5:30
जागतिक महिला दिनाची तयारी जोरात चालू असताना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानकावर एका उस तोडणी मजूर महिलेने शनिवारी(दि.७) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका बाळाला जन्म दिला. वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाली नसतानाही आईसह बाळ सुखरुप आहे.
श्रीगोंदा : जागतिक महिला दिनाची तयारी जोरात चालू असताना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानकावर एका उस तोडणी मजूर महिलेने शनिवारी(दि.७) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका बाळाला जन्म दिला. वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाली नसतानाही आईसह बाळ सुखरुप आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव केरू पोकळे हे व त्यांची पत्नी सलाबाई हे दोन लेकरांसह दौड शुगर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आले होते. सलाबाई या गरोदर होत्या. अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी त्या पतीबरोबर ऊस तोडत होत्या. पोटात दुखू लागल्याने श्रीगोंद्यात बसने जाण्यासाठी निघाल्या असताना पेडगाव बसस्थानकावर त्यांची प्रसुती झाली.
शासन महिलांना गरोदरपणाची सहा महिन्याची रजा देते. त्यांना त्या काळात पगार देते. मात्र आजही गरीब कुटुंबातील महिलांना गरोदरपणाच्या काळात ना सकस आहार, ना रजा.. अशी अवस्था आहे. ऊस तोडणी मजुरांची महिला रस्यावर प्रसूती होते. तिला कसल्याही आरोग्य सुविधा मिळाल्या नाहीत. मग कशासाठी जागतिक महिला दिन साजरा करायचा? हा खरा प्रश्न आहे.