अहमदनगरमध्ये शेतक-यांवर पोलिसांचा गोळीबार; ऊस दराचा प्रश्न पेटला : शेतक-यांकडून जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:22 PM2017-11-15T13:22:08+5:302017-11-15T15:38:28+5:30
आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी बुधवारी लाठीमार केला. तसेच अश्रूधुराचा मारा केला. यात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी राखीव दलाला पाचारण केले आहे.
अहमदनगर : शेवगाव तालुक्यात ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, अशी मागणी करणा-या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी बुधवारी (15 नोव्हेंबर) गोळीबार केला. यात एका शेतक-याच्या छातीत छरर्रा घुसला. हा शेतकरी गंभीर जखमी झाला असून, दुस-या शेतक-याच्या हातात छरर्रा घुसला आहे. पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रूधुराचा मारा केला.
परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी राखीव दलाला पाचारण केले आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार १०० रुपये एकरकमी भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्यावतीने शेवगाव तालुक्यातील घोटण येथे सोमवारपासून उसाने भरलेली वाहने अडविण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले.
मंगळवारीही (14 नोव्हेंबर) हे आंदोलन सुरुच राहिले. दरम्यान बुधवारी हे आंदोलन चिघळले असून, पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची धरपकड सुरु केली आहे. राज्य संघटनेचे प्रकाश बाळवडकर, अमरसिंह कदम, शेवगावचे दादासाहेब टाकळकर, संदीप मोटकर, शुभम सोनावळे, दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, बाळासाहेब फटांगरे यांच्यासह दहा ते १५ शेतकरी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केला. पैठण-शेवगाव रोडवर घोटण, खानापूर, क-हेटाकळी, एरंडगाव, कुडगाव आदी गावांमध्ये रास्ता रोको केला. रस्त्यावर टायर जाळले, रस्त्यावर लागडे आणून जाळली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. खानापूर येथे अश्रूधुराचा मारा केला. यामध्ये दोन शेतकरी जखमी झाले असून, उत्तम मापारी या जखमीस शेवगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. पोलिसांकडून लाठीमार सुरू होताच आंदोलकांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून, शेवगाव तालुक्यात वातावरण तणावपूर्ण बनले आहे.