राज्यात यंदा ८ लाख हेक्टरवर ऊस शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:30 PM2019-11-10T12:30:17+5:302019-11-10T12:31:07+5:30
यंदा महाराष्ट्रात ८ लाख २२ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक आहे़ या उसाच्या गाळपासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव पाठविले आहेत.
भाऊसाहेब येवले ।
राहुरी : यंदा महाराष्ट्रात ८ लाख २२ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक आहे. या उसाच्या गाळपासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव पाठविले आहेत. यंदा फक्त ५१८ लाख मेट्रिक टन उसाची उपलब्धता होण्याची शक्यता असल्याने ऊस टंचाईचे सावट आहे.
गेल्यावर्षी ११ लाख ६२ हजार हेक्टरवर ९४७ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध झाला होता. गेल्या वर्षी राज्यात १९५ साखर कारखाने सुरू होते़ यंदा परवाना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऊस उपलब्धता कमी झाल्यास किती कारखाने चालू शकतात. याबाबत शंका आहे़ यंदा चांगला पाऊस पडल्याने या महिन्याअखेर ऊस लागवडीला मोठ्या प्रमाणावर सुरूवात होणार आहे. शेतात पाणी असल्याने ऊस लागवडीला विलंब होत आहे. आगामी दोन वर्षे मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न कायम राहणार आहे. आवश्यक त्या प्रमाणावर साखर उत्पादन करून इथेनॉल निर्मितीवर भर दिला. तरच साखर कारखाने अडचणीतून बाहेर पडू शकतील अशी परिस्थिती आहे.
अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १६ साखर कारखान्यांनी आॅनलाईन प्रस्ताव परवान्यासाठी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविले आहेत़. जिल्ह्यातील सरासरी ऊस क्षेत्र १ लाख २० हेक्टर आहे. यंदा जिल्ह्यात अंदाजे ७० हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे़.
यंदा राज्यात कमी ऊस आहे. त्यामुळे सुरु झालेले कारखानेही अल्प कालावधीसाठी चालतील. आतापर्यंत १६१ कारखान्यांनी गाळपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत, असे साखर संचालक दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले आहे.