संशयिताची बालसुधारगृहात आत्महत्या, अहमदनगरमधील घटना; कारण मात्र अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:39 AM2017-10-11T04:39:47+5:302017-10-11T04:40:12+5:30
शहरातील बालसुधारगृहातील १७ वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली़
अहमदनगर : शहरातील बालसुधारगृहातील १७ वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली़ आत्महत्या केलेल्या मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे़ या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
चुलत मेहुण्याच्या खूनप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या या मुलाची न्यायालयाने २२ एप्रिल रोजी बालसुधारगृहात रवानगी केली होती. बालसुधारगृहातील त्याचा कार्यकाल २२ आॅगस्ट रोजी संपला होता़ त्यानंतर त्याला त्याच्या मूळगावी पाचेगाव (ता़ नेवासा) येथे पाठविले. मात्र, घरी नातेवाइकांकडून जिवे मारण्याची धमक्या येत असल्याची तक्रार या मुलाने बालन्यायमंडळाकडे केली होती़ त्यानंतर, त्याला पुन्हा बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते़ मंगळवारी पहाटे बालसुधारगृहाच्या आवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत कर्मचाºयांना हा मुलगा आढळला़
घटनेचा पश्चात्ताप
‘हातून चुलत मेहुण्याचा खून घडल्यानंतर मला पश्चात्ताप होत आहे. मेहुण्याची छोटी मुले माझ्या नजरेसमोर येतात,’ असे तो बालसुधारगृहातील कर्मचाºयांना सांगत असे़ अखेर त्याने आपली जीवनयात्रा संपविली़
जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने यांनी बालसुधारगृहात भेट देऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत, सुधारगृह अधीक्षकांना अहवाल देण्यास सांगितले आहे़ दरम्यान, या घटनेमुळे बालसुधारगृहातील सुरक्षिततेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे़