पाचपुतेंच्या उमेदवारीचे खासदार सुजय विखेंकडून सुतोवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 04:29 PM2019-09-09T16:29:37+5:302019-09-09T16:29:46+5:30
मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी मदत केली. आमच्या मनात पाचपुते सोडून कोण असणार? त्यामुळे बाकीच्यांनी चिंता करू नका, असे म्हणत विखेंनी आमदारकीचे तिकीट बबनराव पाचपुते यांनाच राहील, असे सुतोवाच केले.
श्रीगोंदा : निवडणुकीत कुणाला काय द्यायचे आम्हाला चांगले माहीत आहे. निर्णय घेताना ५० वर्षात विखे घराणे चुकले नाही. लोकसभा निवडणुकीत मला ज्यांनी मदत केली तेच विधानसभेचे उमेदवार राहणार आहेत, असे सांगत खासदार सुजय विखे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.
देवदैठण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री सौरऊर्जा १० मेगावॉट प्रकल्पाचे लोकार्पण विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, सभापती शहाजी हिरवे, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, सरपंच जयश्री गुंजाळ, पुजा बनकर, सतिश धावडे, सचिन कातोरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी विश्वास गुंजाळ म्हणाले, विखे पाटील तुम्ही बंद खोलीत चर्चा करतात. त्यामुळे श्रीगोंद्यात भाजपाची उमेदवारी कुणाला यावर कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.
तोच धागा पकडून सुजय विखे म्हणाले, श्रीगोंद्यात आमदारकीचे दहा जण आहेत. त्यापैकी चार जण मला गाडीत ठेवावे लागतात. ते खाली उतरले तर गडबडी होतील. श्रीगोंद्यात काहीही चर्चा झाली तरी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे काम चांगले आहे. मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी मदत केली. आमच्या मनात पाचपुते सोडून कोण असणार? त्यामुळे बाकीच्यांनी चिंता करू नका, असे म्हणत विखेंनी आमदारकीचे तिकीट बबनराव पाचपुते यांनाच राहील, असे सुतोवाच केले.