यंदाचा उन्हाळा राहील सौम्य- प्रा.बी.एन.शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:35 PM2020-03-01T13:35:50+5:302020-03-01T13:36:40+5:30
गेल्या वर्षी असह्य ठरलेला उन्हाळा तुलनेत यावर्षी सौम्य राहील. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. ओसाड जमीन गवताने व्यापली. त्यामुळे यंदाचे तापमान काहिसे कमी राहील.
संडे मुलाखत-चंद्रकांत शेळके
अहमदनगर : गेल्या वर्षी असह्य ठरलेला उन्हाळा तुलनेत यावर्षी सौम्य राहील. यंदा पावसाचे
प्रमाण चांगले असल्याने बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. ओसाड जमीन गवताने व्यापली. त्यामुळे यंदाचे तापमान काहिसे कमी राहील. सध्या हवेत असलेला सौम्य गारवाही दोन-तीन दिवसांत ओसरेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ बी. एन. शिंदे यांनी ‘लोकमत संवाद’मध्ये व्यक्त केला आहे.
तापमान का वाढते?
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली. परिणामी जमीन तापण्यास मोठा कालावधी मिळाला. त्यामुळे उन्हाळ्यात तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले. साधारण उन्हाळ्यात पिके नसल्याने, तसेच माळरानावर गवत नसल्याने सूर्यप्रकाश थेट जमिनीत खोलपर्यंत जाऊन जमीन तापते. शिवाय उन्हाळ्यात नांगरट झाल्याने काळी जमीन वर येऊन आणखी उष्णता खेचते. त्यातून तापमान वाढते.
पाण्याच्या उपलब्धतेबाबत?
त्या तुलनेत यंदा पाऊस चांगला झाला आहे. ठिकठिकाणी जलाशय भरले असून रब्बी पिकांची स्थिती चांगली आहे. एकूणच बागायती क्षेत्र वाढले. शिवाय पावसामुळे पडिक जमिनीवर गवत मोठ्या प्रमाणावर उगवले. एकंदरीत जमीन मोठ्या प्रमाणावर आच्छादित झाली. त्यामुळे उन्हाळ्यात सूर्यकिरणे थेट जमिनीवर न पडता या अडथळ्यांवर पडत आहेत. बागायती पिकांची काढणी झाली तरी पाण्याची उपलब्धता असल्याने एप्रिल, मे या महिन्यांत उन्हाळी पिके किंवा चारापिके घेतली जातात. त्यामुळे बहुतांश जमीन आच्छादीतच राहील. पडिक जमिनीवरील गवत वाळेल व त्याचा रंग सोनेरी पांढरा पडेल. या रंगातून जास्त उष्णता परावर्तित होते व ती जमिनीपर्यंत येत नाही. या कारणांमुळे यंदाचा उन्हाळा सौम्य राहणार आहे. परिणामी तापमान दोन ते तीन अंशाने कमी राहील, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
उन्हाळ्यात घराचा असा करा बचाव?
उन्हाळ्यात स्लॅबची घरे तापल्याने रात्री प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो. यापासून बचावासाठी काही उपाय शिंदे यांनी सांगितले आहेत. स्लॅबच्या पृष्ठभागाला चुना मारावा. चुन्यामुळे उष्णता परावर्तित होऊन ६० टक्के फरक जाणवेल. याहीपुढे या चुन्यावर सायंकाळी चारनंतर तासाभराच्या अंतराने पाणी शिंपडले तर आणखी १० टक्के फरक जाणवेल.
उकाड्यापासून कसा बचाव करायचा?
परिणामी ७० ते ८० टक्के स्लॅब कमी तापेल. पाणी मारण्यासाठी मायक्रो स्प्रिंकलरची व्यवस्थाही करता येईल. याशिवाय घराच्या पश्चिमेकडील भिंत हिरव्या शेडनेटने किंवा वेलवर्गीय वनस्पर्तींनी झाकली तर भिंत उष्णतेपासून बचावेल.या काही उपाययोजना केल्यास उकाड्यापासून सहज बचाव होईल.