संडे हटके : विमानतळाचं फील आता साईंच्या दर्शनबारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:09 PM2019-02-17T12:09:19+5:302019-02-17T12:09:22+5:30
साईनगरीत येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ऊन-वा-यात लांबच लांब रांगा लावण्याचे श्रम लवकरच वाचणार आहेत़ साईबाबा संस्थानने विमानतळासारख्या सुविधा देणा-या अद्यायावत दर्शनबारीचे काम सुरू केले असून वर्षभरात हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत दाखल होईल.
प्रमोद आहेर
शिर्डी : साईनगरीत येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ऊन-वा-यात लांबच लांब रांगा लावण्याचे श्रम लवकरच वाचणार आहेत़ साईबाबा संस्थानने विमानतळासारख्या सुविधा देणा-या अद्यायावत दर्शनबारीचे काम सुरू केले असून वर्षभरात हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत दाखल होईल.
भाविकांचे दर्शन सुलभ व आनंददायी व्हावे यासाठी साई संस्थानच्या वतीने सुसज्ज दर्शनबारी प्रकल्प उभारला जात आहे़ दर्शनरांगेची मुख्य इमारतीचे बांधकाम २० हजार ८२ चौरस मीटर असून तळमजला ६६ हजार ५८१.६० चौरस मीटर, पहिला मजला ६ हजार १३३.०२ चौरस मीटर तर दुसरा मजला ६ हजार १३३.०२ चौरस मीटर आहे. या इमारतीमध्ये तीन भव्य प्रवेश हॉल आहे. यामध्ये प्रथमोपचार कक्ष, मोबाईल व चप्पल लॉकर्स, बायोमेट्रिक पास, सशुल्क पास, लाडू विक्री, उदी व कापडकोठी, बुक स्टॉल, डोनेशन आॅफिस, चहा, कॉफी काऊंटर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र असे स्वच्छतागृहे, उदवाहक, पिण्याचे पाणी, वायुविजन इत्यादी व्यवस्था असतील़
अन्य देवस्थानांच्या तुलनेत शिर्डीत दर्शन व्यवस्था चांगली असली तरी टाईम स्लॉटनुसार दर्शन देणार असाल तर समाधीवर क्षणभर डोक टेकवू द्या, किमान हस्तस्पर्श करू द्या, आरडाओरड करून बाहेर ढकलू नका अशी सामान्य भाविकाची अपेक्षा आहे.
एकाचवेळी २४ हजार साईभक्तांची व्यवस्था
या इमारतीमध्ये एकूण एकाचवेळी २४ हजार साईभक्तांची व्यवस्था होईल. याकरिता ११२.४१ कोटी रुपये खर्च येणार आहे़ यामुळे दर्शन रांगेतील सामान्य भाविकांची फरफट थांबवणार आहे़ सध्या युद्धपातळीवर हे काम सुरू आहे़ साईसंस्थानचा अध्यक्ष होण्यापूर्वी डॉ़ सुरेश हावरे यांना साईमंदिरातील गर्दीचा वाईट अनुभव आल्याने त्यांनी पुन्हा शिर्डीला न येण्याचे ठरवले होते़ पण संस्थानचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होताच ‘हे चित्र बदलवू’ असे त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत जाहीर केले होते़ मात्र दुर्दैवाने त्यासाठी काही झाल्याचे दिसत नाही़
दुमजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर सहा असे बारा वातानुकूलित हॉल असतील़ एका हॉलची क्षमता दीड ते दोन हजार भाविकांची असेल़ भाविकांना चहा, कॉफी, बिस्किटे मोफत असतील, वॉश रूमसह सर्व सुविधा येथे असतील़ भाविकांचे दर्शन सुखकर व झटपट होईल. - रूबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी.