संडे अँकर : ४४ शिक्षकांची वेतनवाढ थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 04:21 PM2019-06-02T16:21:46+5:302019-06-02T16:22:09+5:30
मागील वर्षी सोयीच्या बदलीसाठी बोगस कागदपत्रे, चुकीची माहिती सादर करुन बोगस पद्धतीने बदली मिळविणाऱ्या ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे़
अहमदनगर : मागील वर्षी सोयीच्या बदलीसाठी बोगस कागदपत्रे, चुकीची माहिती सादर करुन बोगस पद्धतीने बदली मिळविणाऱ्या ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे़ गेल्या एक वर्षापासून ही कारवाई रखडली होती़ अखेर ३० मेच्या रात्री शिक्षकांवरील कारवाईच्या फाईलवर मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी सही केली़
बोगस कागदपत्रे सादर करुन किंवा दिशाभूल माहिती देऊन मागील वर्षी बदली मिळविणाºया शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले होते़ मात्र, वर्ष उलटले तरीही या शिक्षकांवर जिल्हा परिषदेकडून काहीही कारवाई झालेली नव्हती़ ९८ शिक्षकांनी दिशाभूल करणारी व बोगस कागदपत्रे सादर करुन बदली मिळविल्याचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागाला सादर झाला होता़ त्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांना नोटिसा बजावून त्यांचा खुलासा मागितला होता़ हा खुलासा आल्यानंतरही सुमारे सहा महिने या शिक्षकांवरील कारवाई रेंगाळली होती़ अखेरीस बदली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या शिक्षकांवरील कारवाईची फाईल मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली़ मुख्याधिकाºयांनी ३० मे रोजी रात्री फाईलवर सही करुन दोषी आढळलेल्या ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली़ कारवाई झालेल्या शिक्षकांना या वर्षी संगणकीय मॅपिंग करु देऊ नये, असे आदेश सरकारने दिले आहेत़ शनिवारी (दि़१) शिक्षकांच्या बदलीसाठी अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली़ त्यात गेल्या वर्षी बोगस पद्धतीने बदली मिळविणाºया शिक्षकांचाही या बदलीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे़
इतर शिक्षकांवर अन्याय
मागील वर्षी बोगस कागदपत्रे, चुकीची माहिती सादर करुन बदली मिळविणाºया शिक्षकांमुळे इतर बदलीपात्र शिक्षकांवर अन्याय झाला होता़ त्यामुळे यंदाच्या बदलीप्रक्रियेत मागील वर्षी बोगस बदली मिळविणाºया शिक्षकांचा समावेश करु नये, अशी शिक्षकांची मागणी होती़ त्याऐवजी मागील वर्षी अन्याय झालेल्या शिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी अनेक शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे लावून धरली होती़ त्यासाठी या वर्षीच्या बदलीच्या नियमावलीचाही दाखला देण्यात आला होता़ मात्र, बदलीच्या यादीत गेल्या वर्षी बोगस बदली मिळविणाºया व कारवाई झालेल्या शिक्षकांचीही नावेही आहेत़ त्यामुळे त्यांचीही बदली होणार आहे़
मागील वर्षी बोगस कागदपत्रे सादर करुन बदली मिळविणाºया ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश ३० मेच्या रात्री काढण्यात आला आहे़ तसेच या शिक्षकांची पुन्हा बदली करण्यात येणार आहे़ मात्र, संगणकीय प्रणालीतील बदलीपात्र शिक्षकांची बदली झाल्यानंतर या ४४ शिक्षकांची बदली करण्यात येणार आहे़ त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही़ उलट त्या ४४ शिक्षकांवर कारवाई म्हणून ही बदली केली जात आहे़
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग