संडे अँकर : पक्ष्यांचे घरटे उंचावर; सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:06 PM2019-06-02T13:06:42+5:302019-06-02T13:06:54+5:30
हवामान खाते नसताना पक्ष्यांच्या घरट्याचे निरीक्षक करून यंदा किती पाऊस पडेल याचा अंदाज पूर्वी बांधला जायचा.
भाऊसाहेब येवले
राहुरी : हवामान खाते नसताना पक्ष्यांच्या घरट्याचे निरीक्षक करून यंदा किती पाऊस पडेल याचा अंदाज पूर्वी बांधला जायचा. अशी प्रथा आजही सुरूच आहे. यंदा पक्ष्यांनी झाडाच्या उंचावर घरटे बांधले आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे संकेत मिळत असल्याची माहिती सडे (ता़ राहुरी) येथील पक्षी घरटे निरीक्षक बापूसाहेब झडे महाराज यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते २७ वर्षांपासून पक्ष्यांचे निरीक्षण करून अंदाज सांगत आहेत़ झडे यांचे अंदाज सहा वेळा चुकीचे ठरले असले तरी २१ वर्ष तंतोतंत खरे ठरले आहेत़
झडे महाराज दरवर्षी पक्ष्यांच्या घरट्यांचा अभ्यास करून अंदाज व्यक्त करतात़ यंदा पक्ष्यांनी झाडावर शेंड्याच्या खाली व मध्याच्यावर घरटे बांधल्याचे झडे महाराज यांचे निरीक्षण आहे़ मे महिन्यात घरटे बांधण्याचे काम पक्ष्यांकडून सुरू आहे़ पक्ष्यांचे घरटे म्हणजे पावसाचा अंदाज घेऊन बांधले जातात, असे शेतकरी मानतात़ त्यामुळे जुने जाणते शेतकरी दरवर्षी पक्ष्यांच्या घरट्यांकडे लक्ष देऊन असतात. झडे महाराज ८० वर्षाचे असून पंढरीचे वारकरी आहेत.
पंढरीच्या वारीला जाताना वारकऱ्यांशी चर्चा करताना त्यांना पक्ष्यांच्या घरट्यांचे निरीक्षण करण्याचा छंद लागला़ मे महिन्यात घरटे बांधल्यानंतर आषाढ ते भाद्रपद या महिन्यात पक्षी त्यात अंडे घालतात़ ज्या दिशेने पाऊस येतो त्याच्या विरुद्ध दिशेने पक्षी घरटे बांधतात़ यंदा पक्ष्यांनी उंचावर व पश्चिम बाजूला घरटे बांधले आहेत़ पक्षी पावसापासून बचाव करण्यासाठी विरूद्ध दिशेने घरटे बांधतात, असे झडे महाराज यांचे निरीक्षण आहे़
झडे महाराज यांचे निरीक्षण..
#शेंड्याच्या खाली घरटे बांधल्यास त्यावर्षी कमी पाऊस पडतो.
#झाडाच्या मध्यावर पक्ष्यांनी घरटे बांधल्यास चांगला पाऊस पडतो़
#मध्याच्या खाली घरटे बांधल्यास मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत मिळतात़
#यंदा पावसाच्या विरुद्ध पश्चिम दिशेला घरटे बांधल्याने सरासरी पाऊस ओलांडणार नसल्याचे संकेत मिळतात़