संडे अँकर : ऊसतोडणी मजुराचा मुलगा दक्षिण कोरियात, नगरच्या युवानने दाखवली दिशा
By नवनाथ कराडे | Published: February 24, 2019 04:36 PM2019-02-24T16:36:34+5:302019-02-24T16:37:12+5:30
वडील ऊस तोडणी मजूर. दुर्धर आजारामुळे अकाली निधन झाले. आईही अंथरूणाला खिळली. अशा परिस्थितीत दिनेशने हार मानली नाही.
नवनाथ खराडे
अहमदनगर : वडील ऊस तोडणी मजूर. दुर्धर आजारामुळे अकाली निधन झाले. आईही अंथरूणाला खिळली. अशा परिस्थितीत दिनेशने हार मानली नाही. परिस्थितीशी लढा देत डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. त्याला नुकतीच दक्षिण कोरियाच्या ‘ह्योसंग’ या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाली. व्हिएतनाममधील सहा महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी तो रवाना झाला. नगरमधील संदीप कुसळकर यांच्या ‘युवान’ संस्थेने त्याला जिवनाची दिशा दाखवली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दिनेश जाधवची संघर्षगाथा...
दुर्धर आजारामुळे वडिलांचे निधन झाले. आईही अंथरुणाला खिळली. दिनेशने आश्रमशाळेत राहून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याचा खरा संघर्ष दहावीनंतर सुरू झाला. सरकारी नियमानुसार दहावीनंतर दिनेशला आश्रमशाळेतून बाहेर पडावे लागले. पुढील निवास, शिक्षण, भोजन, करिअर मार्गदर्शन असे अनेक प्रश्न दिनेश समोर होते.
अशा परिस्थितीत त्याला अहमदनगर शहरातील संदीप कुसळकर यांच्या ‘युवान’ संस्थेची माहिती मिळाली. चांगला अभ्यास करण्याच्या अटीवर त्याला ‘युवान’ मध्ये प्रवेश मिळाला. मिळालेल्या संधीचे दिनेशने सोने केले. पुढील सत्रात विशेष प्राविण्यासह सर्व विषयात तो उत्तीर्ण झाला. पुढील २ वर्षे टॉप राहिला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून विशेष प्राविण्यासह डिप्लोमा दिनेशने पूर्ण केला. पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी ‘युवान’ घेत होते. मात्र आईच्या उपचारासाठी त्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नगरमधील एमआयडीसीत काही महिने काम
केले. चांगल्या नोकरीसाठी संधीची वाट तो पाहात होता. ही संधी त्याला नुकतीच चालून आली. औरंगाबाद येथे दक्षिण कोरियाच्या नामांकित ‘ह्योसंग’ या बहुराष्ट्रीय कंपनीत त्याची नुकतीच निवड झाली. कंपनी मार्फत विशेष प्रशिक्षणासाठी तो व्हिएतनामला पोहोचला आहे. बिकट परिस्थितीवर ‘युवानच्या’ मदतीने मात करत तो सज्ज झाला आहे.
मिळेल ते काम करून शिकला
आईने जमविलेल्या तुटपुंज्या बचतीतून खाजगी तंत्रनिकेतन कॉलेजला प्रवेश मिळवला. होस्टेल, मेसचा खर्च भागविण्यासाठी तो बाहेर राहून मिळेल ते काम करू लागला. काम करून शिकू लागला. अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्याने इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या पहिल्या सत्रात ३ विषयात नापास झाला.
बिकट परिस्थितीत युवानने मला शिक्षणासाठी मदत केली. त्यामुळे मला परदेशात जाण्याची संधी मिळाली. समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी एका वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहे. प्रशिक्षणानंतर ‘मेक इन इंडिया मोहिमेत माझा खारीचा वाटा उचलणार आहे. -दिनेश जाधव