Sunday Special : राष्ट्रसंताच्या जन्मगावी कारसेवेतून स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 03:42 PM2019-02-24T15:42:12+5:302019-02-24T15:42:30+5:30
राष्ट्रसंत श्री आनंदऋषी महाराज यांचे जन्मगाव असलेल्या पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथे प्रवीणऋषी महाराज यांच्या संकल्पनेतून श्री आनंद चरण तीर्थाची उभारणी होत आहे.
उमेश कुलकर्णी
पाथर्डी : राष्ट्रसंत श्री आनंदऋषी महाराज यांचे जन्मगाव असलेल्या पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथे प्रवीणऋषी महाराज यांच्या संकल्पनेतून श्री आनंद चरण तीर्थाची उभारणी होत आहे. याठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी शेकडो आनंदभक्त जमतात. जमलेले आनंदभक्त हातात खराटे, खुरपे,खोरे घेत परिसराची स्वच्छता करीत कारसेवा करतात. यात महिला व पुरूषांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो.
गेल्या पाच महिन्यांपासून दर पौर्णिमेला हा कारसेवेचा उपक्रम सुरू आहे. शिवजयंतीदिनी झालेल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी पुणे, नगर,शेवगाव,नेवासा व पाथर्डी तालुक्याच्या विविध गावांमधून तसेच चिचोंडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने कार सेवेसाठी जमले होते. जमलेल्या भाविकांनी हातात खराटे घेत परिसराची स्वच्छता केली. तसेच वाढलेले गवत खुरप्यांनी काढले. परिसरात लावलेल्या झाडांची स्वच्छता करीत झाडांना पाणी दिले.
३५ एकर जागेवर श्री आनंद चरण तीर्थाची उभारणी होत आहे. यासाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दोन वर्षात चरण तीर्थाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर चिचोंडीचा कायापालट होईल. सुमारे चार ते पाच तास जमलेले आनंदभक्त निस्वार्थी भावनेने कारसेवा करतात. यात वेगळाच आनंद मिळत असल्याचे भक्तांनी सांगितले. कारसेवा झाल्यानंतर भक्तांतर्फे सामूहिक प्रतिक्रमण सूत्र विधी करण्यात आला. त्यानंतर मिरी येथील चंद्रकांत गांधी परिवारातर्फे भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. सायंकाळी पाथर्डीच्या श्री गुरू आनंद संगीत मंडळातर्फे ‘एक श्याम गुरू आनंद के नाम’ हा भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध झाले.